Tuesday, March 19, 2024
Homeमहाराष्ट्रकशासाठी? भाकरीसाठी...

कशासाठी? भाकरीसाठी…


आपण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते. ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय, नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो. अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर, गाव, शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे. हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा सतत सुरू आहे.

पोटासाठी लोक हसत-हसत विस्थापितांच जीवन निवडतात अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. माझे चुलते, भाऊ आणि अनेक स्वकियांनी भाकरीच्या शोधात आपल घर सोडल, त्यांचा निवासाचा पत्ता बदलला आणि जो जिथ गेला तिथलाच होवून राहिला तोही कायमचाच. ही वास्तविकता मानवी गरज आणि विकासाचा अभिन्न अंग झाली आहे. या गोष्टीला कोणीच नाकारणारही नाही. भाकरीचा शोध ही अशी बाब आहे ज्याला कोणी दूर्लक्षित करू शकत नाही. ही भाकर कुठे मिळेल याचा अंदाज सूरूवातीला कोणीच करू शकत नाही. हे काळच निश्चित करतो की आपल्याला कोठे जावे लागेल.आपला जन्म कुठे तरी होतो, मोठे कुठेतरी आणि नौकरी अन्य कुठेतरी. ज्या ठिकाणी आपल्या उदनिर्वाहाची सोय होते तिथे सुरवातीला भाडयाने घर घ्यावे लागते. जर आर्थिक सुबत्ता आली तरच भविष्यात स्वत:चे घर बनते नाही तर अनेकांनी संपूर्ण आयुष्यच भाड्याच्या घरात अथवा सरकारी क्वार्टर मध्ये घालावे लागते . नौकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळणा-या पेंशनमधुन दोन खोल्यांच्या निवारा शोधावा लागतो किंवा गावाकडची वाट धरावी लागते. गावाकडे परतत असताना मात्र त्यांनी जे स्वप्न बघितले असते की त्यांना ते गाव पहायला मिळेल जे त्यांनी सोडताना बघितले होते ते गाव पहायला मिळत नाही. विकासाच्या स्पर्धेत गावाचा जुना चेहरा-मोहरा पूर्णपणे बदललेला असतो. अनेक वर्षे गावापासून दूर राहिल्याने जुने स्नेह-संबंध पूर्णपणे तुटलेले असतात अशा बदललेल्या परिस्थितीशी समायोजन साधणे खरोखरच अवघड असतं.
शासकीय क्वार्टरची बनावट, रंगरंगोटी आणि सजावट एकसारखी असते मग ते रेल्वे, बँक, केंद्र सरकारचे कर्मचारी, पोलिस अथवा केंद्रीय शाळांच्या शिक्षकांचे. म्हणजे सगळी रचनाच एकसारखीच असते. त्यातल्या त्यात कधी शेजारी बदलेल हे कोणीच सांगु शकत नाही. प्रत्येक दोन-पाच वर्षात आपले क्वार्टर किंवा पत्ता बदलला जातो. याचा एक फायदा हा आहे की, आपल्याला कोणत्या शेजा-याशी बांधिल रहावे लागत नाही मात्र तोटा हा आहे की, आपल्या मुलांना सतत बदलणारे मित्र, शेजारी आणि त्यांच्या बदलणा-या शाळांशी स्वत:ला जुळवून घ्यावे लागते. मोठे या परिस्थिला जुळवून घेवू शकतात मात्र मुलांच्या मनात बालपणीच्या कोणत्याच मित्राची स्थायी आठवण बनु शकत नाही.
खरंतर भाकरीचा शोध आणि चिंता हा असा विषय आहे ज्याला कोणीच टाळू शकत नाही. आपले कित्येक मित्र जे सोबत शिकत होते आज न जाणो कुठे आहेत?कोणी मुंबई, पुणे, बैंगलोर, लंडन, दुबई अथवा विदेशात जिथे नौकरी मिळाली तिथे आहे. जे विदेशात आहेत ते सतत आठवण करतात की, ते दिवस काय दिवस होते. महेमूदची चहाची टपरी तिथेच आहे का ? मोहन टॉकीज होती तशीच आहे की मल्टीप्लेक्स मध्ये बदलली आहे अशे नानाविविध प्रश्न विचारतात. ते अशाप्रकारचे प्रश्न विचारून आपल्या आठवणी ताज्या करत असतात. माणसाची ही विवशता आहे की, आपण जे मागे सोडून आलेलो असतो त्या गोष्टी काही ना काही कारणाने आठवत राहतात.
विकास योजनेमुळे विस्थापित होवून गाव सोडावे लागणा-यांचे दु:ख तर खूप वेगळे आहे. धरणांच्या निर्मितीमुळे हजारो गावांना नाईलाजाने का होईना जलसमाधी घ्यावी लागली आहे. तेथील लाखो लोकांना बेघर झाल्याने गाव सोडावे लागले आहे. गावासोबतच तेथील परंपरेलाही जलसमाधी मिळाली. आपल राहत घर, गावातील मंदीर अथवा नदी यांच्यासोबत एकप्रकारचा स्नेहभाव जुडलेला असतो. त्यासोबत अनेक आठवणी जुडलेल्या असतात. मिळेल तो मोबदला घेवून त्यांना जिथे आसरा मिळेल तिथे रहावे लागते अर्थातच सगळे गावकरी विखुरलेले असतात. कोणी कुठे तर कोणी कुठे. ज्या गावात आसरा मिळतो तेथील लोक या नविन पाहुण्यांना सहजासहजी स्विकारतीलच असे नाही. गाव मात्र सतत आठवत राहत. अनेकदा विस्थापणाला आपण निवडतो ज्यावर आपल नियंत्रण राहत तर कित्येकदा विस्थापन आपल्याला, ज्यावर आपल कसलच नियंत्रण राहत नाही.
विस्थापन हे दोन प्रकारच असत पहिल आपण मनापासून निवडलेल आणि दुसरं आपल्यावर परिस्थितीने थोपवलेल. पहिल्या प्रकारात आपण आनंदाने आपल घर, गाव सोडतो. यावेळी पूर्ण नियोजन केलेले असते. कुठे जायचे, कुठे राहायचे, पगार किती मिळेल वगेरे-वगेरे. त्यात जर वर्ष-दोन वर्षासाठी कंपनी मार्फत विदेशात गेलेले असतील तर तेथील डॉलर मध्ये मिळणारा गलेलठ्ठ पगार आणि सुविधा पाहून ते तिथे कायमचेच घरोबा करतात आणि आनंदाने राहतात. अशांना आपल्या देशाची, गावाची आठवण काही खास वेळी, सण अशा वेळीच येते. दुस-या प्रकारात निवडीची संधी नसते. इथे आपली भूमिका फक्त याचकाचीच असते. जिथे आसरा मिळेल तिथे जायचे. कमीत-कमी दोन वेळची भाकर आणि डोक्यावर छप्पर तर मिळते आहे यातच आनंद मानायचा. शेवटी जो जिथे गेला तिथलाच होवून जातो आपल्या गावाकडे तो कधीच परतत नाही. कशासाठी? तर भाकरीसाठी….
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई
संपर्क – ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

3 COMMENTS

Most Popular