Friday, April 19, 2024
HomeIndiaभारताला टोकियो ऑलिम्पिककडून आशा

भारताला टोकियो ऑलिम्पिककडून आशा


टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला उद्या २३ जुलै पासून सुरुवात होणार असून ८ ऑगस्टला या स्पर्धेचा समारोप होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ही स्पर्धा अगोदर मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत घेण्याचे आयोजकांनी ठरवले होते, मात्र आता ही स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे. खेळाडूंना एकीकडे प्रेक्षकांविना चांगले प्रदर्शन करण्यासाठी स्वत:ला प्रेरित करावे लागेल तर दूसरीकडे कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. नव्या नियमांनूसार अंतिम फेरीत पोहचल्यानंतर कोरोना संक्रमित झाल्यास पदक गमावण्याचा धोका आहे. यामुळे याचाही अतिरिक्त दबाव खेळाडूंवर असेल.


ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताची ऑलिम्पिक मधील आत्तापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. भारताने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ७ रजत आणि १२ कांस्य पदकं पटकावली आहेत. या ९ सुवर्ण पदकांमधील हॉकीमधले ८ सुवर्ण पदक काढले तर केवळ एक सुवर्ण पदक इतर खेळातील आहे, ज्याला निशानेबाजीत अभिनव बिंद्राने २००८ मधिल पेइचिंग ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते. दूसरीकडे अमेरिकेचा जलतरणपटु माइकल फेल्पस याने चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेवून २३ सुवर्ण पदकांसहित एकूण २८ पदकांची कमाई केली आहे. यावरून आपल्याला भारताच्या परिस्थितीचा अंदाज येवू शकतो.


भारताने सर्वप्रथम १९०० साली ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी भारताने फक्त एक स्पर्धक पाठवला होता. नॉर्मन प्रिचर्ड असं त्यांचं नाव होतं. त्यांनी पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि २०० मीटर हर्डल स्पर्धेत मेडल जिंकलं होतं. त्यानंतर भारताने प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. १९२० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टीम पाठवली होती. त्यात ६ अॅथलीट आणि २ कुस्तीपटूंचा समावेश होता. १९२८ पर्यंत भारताला कोणतंच पदक मिळालं नाही. त्यानंतर १९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अम्सटर्डम मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. भारताने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि अंतिम सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं होतं. त्यानंतर १९३२ मध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने विक्रमी फरकाने पराभूत केलं होतं. हा विजय आजही स्मरणात आहे. बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धेमध्ये भारताने जर्मनीला ८-१ ने पराभूत केलं. त्यावेळेस भारत ब्रिटिश इंडियाकडून स्पर्धेत खेळत होता.
स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं होत. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावलं. कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.
१९८० नंतर थेट १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत लिएंडर पेसने टेनिस मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. भारताला टेनिस मध्ये मिळालेलं हे एकमात्र पदक आहे. त्यानंतर २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तिने २४० किलो वजन उचललं होतं. कर्णम देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पहिली महिला अ‍ॅथलीट आहे.
यावेळी टोकियो ऑलिम्पिक च्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. परंतु पदकांच्या बाबतीत बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, हॉकी आणि बॉक्सिंग याच खेळांकडून अपेक्षा आहेत. हे खरे आहे की कोरोनामुळे यावेळी खेळाडू चांगली तयारी करू शकले नाहीत, परंतु ही परिस्थिती जगातील बहुतेक देशांच्या खेळाडूंची आहे. या वातावरणात किती नवीन जागतिक आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड तयार होतात, हे पाहण्यासारखे ठरेल. कोरोना महामारीमुळे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, ज्यामुळे अनेक खेळाडूंचे टोकियोला जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अशा खेळाडूंमध्ये लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचा समावेश आहे.
भारतासाठी पदकांची आशा करताना, आपल्या लक्षात येणारे पहिले नाव म्हणजे देशाची स्टार शटलर पी.व्ही सिंधू. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती रौप्यपदक विजेती आहे. गेल्यावेळी तिला कॅरोलिना मारिनकडून पराभव पत्कारावा लागला होता. पण यावेळी ती चांगल्या तयारीसह जात आहे. सिंधूने यावर्षी ऑल इंग्लंड बॅडमिंटन आणि स्विस ओपनमध्ये भाग घेतला आहे. दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क तेई सेंग यांच्या देखरेखीखाली गेल्या तीन ते चार महिन्यांत तिने चांगली तयारी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या शैलीतील खेळाडूंच्या विरोधात खेळण्यास अडचण येऊ नये म्हणून ती प्रशिक्षणात खेळाडू बदलून दररोज सराव करीत आहे.
बॉक्सिंगमध्ये विजेंदरने २००८ मध्ये कांस्यपदक जिंकून तरुणांना आकर्षित केले होते. यावेळी अमित पन्हाळ आणि मेरी कोम हे पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मेरी कोमने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ही तिची शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असेल. म्हणून ती याला संस्मरणीय करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. विश्वविजेतेपद जिंकणारा अमित पंघाल फ्लायवेट प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॉक्सर म्हणून ऑलिम्पिक रिंगमध्ये दाखल होणार आहे. आमचे बाकीचे बॉक्सरही काही कमी नाहीत, पण ते किती आव्हान देतात हे पाहणे बाकी आहे.
शूटिंगमध्येही आमची स्थिती चांगली आहे. असे मानले जाते की आमचे नेमबाज जागतिक दर्जाचे आहेत. यावेळी १५ भारतीय नेमबाजांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता क्वालिफाय केली आहे. हे त्यांचा दबदबा दर्शविणारे आहे. मनु भास्कर आणि सौरभ चौधरी, यशस्विनीसिंग देसवाल आणि अभिषेक वर्मा एअर पिस्तूलमध्ये आणि देवेश सिंह सिंग पंवार व इलेव्हनिल यांची जोडी मिश्र गटात या वेळी पदक मिळवू शकेल. भारताला वैयक्तिक गटातही पदक मिळण्याची चांगली शक्यता आहे.
भारतासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे ब-याच दिवसानंतर हॉकी संघाला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. याचे कारण म्हणजे मागील दोन वर्षात त्याने अनेक मातब्बर संघांवर विजय मिळवला आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा संघ म्हणून यावेळी तो भाग घेत आहे. याशिवाय विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वात कुस्ती संघ, तीरंदाजीत दीपिका कुमारी आणि भाला फेकीत नीरज चोप्रा चमकदार कामगिरी करू शकतात.
२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली होती. भारताच्या पदरी फक्त दोन मेडल पडली होती. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं होत. तर पी. व्ही. सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावलं होत. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत काय कामगिरी करतो ? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अॉलिम्पिक सारख्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होत असल्याने कडवा प्रतिकार करत पदक मिळवण्याचे मोठे आव्हान असते. मात्र यंदाच्या अॉलिम्पिक स्पर्धेमध्ये कोरोनाचेही आव्हान उभे आहे. या दोन्ही आव्हानांवर मात करून पदक मिळवणा-या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे थोडेच असेल. भारतीय खेळाडूंच्या तयारीकडे पाहून मात्र ही अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही की, यावेळी भारत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेल.
-सुरेश मंत्री
संपर्क- ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Most Popular