महागाव : तालुक्यात सध्या ऊस तोडीचा हंगाम धडाक्यात सुरू आहे. ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यातील कामगार या ठिकाणी आपल्या कुटुंबियांसह आले आहेत. मात्र ऊस तोडीचे काम एका जागी स्थिर नसल्याने ऊसतोड मजुरांची मुले शाळेपासून वंचित राहात आहेत.

या चिमुरड्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न होत असले तरी ते तोकडे पडत आहेत. अनेक ठिकाणी साखर शाळा बंद असून काही ठिकाणी त्या सुरू असल्या तरी त्यामधील गुणवत्ता तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. ऊस तोडणीसाठी वर्धा, नांदेड, परभणी, बिड, लातुर आदी परजिल्ह्यातील ऊस तोड मजूर मुलाबाळांना घेऊन उसाच्या फडात दाखल झाले आहेत. शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या या मुलांचे जीवन अतिशय हलाखीचे आहे. ऊस तोडणीच्या वेळी या मुलांना शेतातील झुडपाच्या सावलीत उसाच्या पाचटावरच बसून दिवस ढकलावे लागत आहेत. त्यामुळे आईबाबांच्या सारखे या मुलांचे आयुष्य उसाच्या फडात जाणार काय? असा प्रश्न पडत आहे .उसाच्या फडात ८ ते १० वर्ष वयाची मुले आपल्या लहान भावंडांना सांभाळत उसाची वाडे गोळा करत दिवस घालवतात अंगात पुरेसे कपडे नाहीत वेळेवर आंघोळी नाही. अनेक जण तर नागवेही, अशा केविलवाण्या अवस्थेतील चिमुरड्यांच्या जिवनात शिक्षणाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्याची गरज आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत ही खेदाची बाब आहे.