Saturday, June 15, 2024

बैलपोळा


‘‘अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला…कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला”
श्रावण महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे सण आजही गावागावांमधुन साजरे होतांना आपल्याला दिसतात. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा. कर्नाटकात याला बेंदूर असं म्हणतात तर कर्नाटकाच्या काही भागात याच सणाला करुनुर्नामी म्हणतात. दक्षिण भारतात यास पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी शेतीवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचे खूप महत्व आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो. आज आधुनिक जगात ट्रॅक्टर द्वारे शेत नांगरले जाते. मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. “आज आवतन घ्या उद्या जेवायला या!” असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने शेकले जाते. यास खांदेमळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी शेतक-यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा,पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असा सजवतात. खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य बनवला जातो.

सायंकाळी शेतकरी आपल्या बैलांसह बैलपोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस; झडत्या (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, मानवाईक (ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा फुटतो, नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. शेतक-याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. बैल नेणा-यास बोजारा (पैसे) देण्यात येतात. बैलाची कायम निगा राखणाऱ्या गडयाला नवे कपडे दिले जातात.
पोळ्याचे महत्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतक-याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. या दिवशी बैलांचा थाट असतो. बैलांना पोळयाच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. असा हा पोळ्याचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतक-याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतक-याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतक-याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत अतित कोण असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात. आजकाल शेतीमध्ये नवनवीन उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शेतीमध्ये बैलांचा वापर फक्त गरीब शेतकरीच करतात. वाढत्या तांत्रिक उपकरणामुळे हळूहळू शेतीच्या कामामध्ये बैलांचा वापर कमी होऊ शकतो आणि बैलपोळ्याची ही परंपरा नावापुरती राहू शकते.
बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात,
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार …

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular