Tuesday, March 19, 2024
HomeIndiaजीवघेणी सेल्फी

जीवघेणी सेल्फी


सेल्फी काढण्यात जेवढी मजा आहे तेवढेच त्याचे चांगले-वाईट परिणामही आहेत. याचा प्रत्यय वारंवार होणाऱ्या घटनांमुळे येत असतो. वैयक्तिक जीवनात अनेकांनी सेल्फीमुळे आपला जीव गमावला आहे. रविवारी सेल्फी काढण्याच्या नादात गोसेखुर्द धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. हे दोघे भाऊ स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर फिरायला आले होते. सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. सेल्फीच्या वेडापायी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये असले तरी ते तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आहे.

सेल्फीचा धोका सरकारनेही ओळखला आहे, ही यातील सकारात्मक बाब म्हणावयास हवी. खुद्द वैद्यकीय क्षेत्रानेच या वेडाला मानसिक आजार म्हटले आहे त्यामुळे या संदर्भात शाळा, महाविद्यालयांच्या पातळीवर प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत आपसुकच अशा काही नकारात्मक गोष्टींची आव्हाने समोर येत राहतील, त्यांना सामोरे जाण्याची तयारीही ठेवलीच पाहिजे.
भारतातील सव्वाशे कोटी लोकांपैकी ८० कोटी लोकांकडे मोबाइल फोन आहे आणि मोबाइलचा वापर कॅमेरा म्हणूनच बहुतांश केला जात असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसते. स्वतःचे फोटो काढणे कोणाला नाही आवडत? या फोटो तंत्रज्ञानात झालेला नवा अविष्कार म्हणजे सेल्फी. कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा फोटो काढण्यालाच सेल्फी म्हणतात. सेल्फी घेण्याची क्रेझ आजकाल प्रत्येकामध्ये आहे. तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याचा किंवा काही मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या लोकांना भेटण्याचा प्लॅन बनतो, तेंव्हा सगळे जमल्यावर सेल्फी घेण्याचा सोहळाच सुरू होतो. फिरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी आणि जर आपण कोणाला भेट असू, तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत सेल्फी फोटो काढले जातात. कित्येक लोक तासन् तास, हजारो सेल्फी काढत असतात. सेल्फीचे हे वाढते वेड लक्षात घेवून काही मोबाइल कंपन्यांनी केवळ सेल्फीसाठी म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कॅमेऱ्याची सोय असलेले मोबाइल बाजारात आणले आहेत.
सेल्फीचे हे वेड लक्षात घेऊन ठिकठिकाणी पर्यटनस्थळांपाशी सेल्फी पॉइंट्सची निर्मिती करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध करणारे फलकही लावण्यात आले आहेत. परंतु जिथे मज्जाव असेल तिथेच मज्जा करण्याच्या मानसिकतेमुळे प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचाच प्रयत्न असतो आणि मग दुर्घटना घडतात. बोटीत बसून सेल्फी काढताना बोट बुडाल्यामुळे, वाहन चालवताना सेल्फी काढताना अपघात झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या अधुनमधून येत असतात. धोकादायक कड्यांच्या टोकावर उभे राहून सेल्फी काढतानाही दरीत कोसळून अनेकजणांचा मृत्यू होत असतो. या प्रत्येक बाबीमध्ये जोखीम आहे, हे माहीत असतानाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आणि मृत्यूला निमंत्रण दिले जाते. अनेकदा हे वेडे सेल्फीच्या नादात इतरांचेही बळी घेत असतात. अशा अपघातांच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांमधून वारंवार येत असतात तरीसुद्धा पुन्हा पुन्हा त्या चुका होत असतात. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही ठिकठिकाणी सेल्फीमुळे दुर्घटना घडल्या आहेत. रशियामध्ये पूल आणि गगनचुंबी इमारतींवरून सेल्फी काढताना पडून अनेकजण दगावले आहेत. ब्राझील, व्हिएतनाम आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात सेल्फीच्या नादामुळे झाले आहेत.
स्वत:च्या प्रेमात पडून सतत सेल्फी काढण्याची सवय म्हणजे ‘सेल्फायटिस’ हा मानसिक आजार असल्याचा निष्कर्ष वैद्यकशास्त्राने काढला आहे. या आजारावरील उपचार हा स्वतंत्र भाग असला तरी सेल्फीच्या वेडापायी अनेकांना प्राण गमावावे लागत असल्याचे वास्तव चिंता वाढवणारे आहे. ‘इंडियाज् जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अॅण्ड प्रायमरी केअर’ मध्ये त्यासंदर्भातील विवेचन करण्यात आले असून सेल्फीचे वेड शार्क माशाच्या हल्ल्यापेक्षा भयंकर असल्याचे त्यात नमूद केले आहे. अर्थात सेल्फीचा आणि शार्क माशांचा संबंध जोडण्याचे कारण नव्हते, विषयाला वैश्विक परिमाण देण्याच्या मोहातून ते घडले असावे. शार्क माशांच्या हल्ल्यात वर्षभरात पन्नास लोकांचा मृत्यू झाला असताना सेल्फी काढताना बळी गेलेल्यांची संख्या २५९ आहे, यावरून सेल्फीशी शार्कचा संबंध जोडण्यात आला असावा. सेल्फीच्या वेडापायी जाणाऱ्या बळींचे गांभीर्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न एवढाच त्याचा उद्देश असावा. किती क्षुल्लक गोष्टीसाठी लोक प्राणाचे मोल देतात, किंवा सेल्फीच्या वेडापायी किती मोठी जोखीम घेतात हे यातून दिसून येते. ऑक्टोबर २०११ पासून नोव्हेंबर २०१७ पर्यंत जगभरात नोंदल्या गेलेल्या १३७ घटनांमध्ये २५९ लोकांचे बळी सेल्फीमुळे गेले आहेत आणि त्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास निम्मे बळी भारतात गेले आहेत, त्यापाठोपाठ रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांचा क्रमांक लागतो. सेल्फीच्या नादात प्राण गमावलेल्यांचे सरासरी वय तेवीस वर्षे असून प्रत्येक तीनांमध्ये एका तरुणी असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
खरं तर, सेल्फी काढल्यामुळे कार्बनं प्रमाण वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वातावरणावर होतो. जगभरातूनच या समस्येचा सामना करावा लागत आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, जगभरात २ अब्जांपेक्षा जास्त स्मार्टफोन युजर आहेत. तर, २०१४ च्या रिपोर्टनुसार ४.४ अब्ज लोकांकडे साधा कॅमेरा असणारे फोन आहेत. जवळपास ९० टक्के लोकं फोनमध्येच फोटो काढतात. एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २००० सालापर्यंत जगभरातून जवळपास ८५ अब्ज इतके फोटो काढले गेले. पण, केवळ एका दशकात त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. २०१३ मध्ये जगभरातून 3.५ लाख कोटी फोटो काढण्यात आले. तज्ञांकडून असाही अंदाज वर्तवला जात आहे की, येणाऱ्या काळात हे आकडे दुप्पट वाढून ७ लाख कोटींपर्यंत पोहचू शकतात.
यावरुनच अंदाज लावता येऊ शकेल की, किती प्रमाणात हे फोटो सोशल मीडियावर अपलोड होत असतील. सोशल मीडियावर अपलोड केले जाणारे फोटो खूप मोठ्या संख्येत डेटा तयार करतात. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड होतात आणि काही काळाने टाईमलाईनवरुन निघूनही जातात. मात्र, हा सर्व डेटा कुठेतरी सेव होत असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साइटवर येणारे फोटो स्टोअर करण्यासाठी डेटा सेंटरची गरज असते. अॅनालिटिक्स मैगज़ीन २०१२ च्या माहितीनुसार सर्व सेंटरवर स्टोअर होणारा ८० टक्के डेटा हा फोटो आणि व्हिडीओ माध्यमातला असतो. सिएनाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ७५०० डेटा सेंटर आहेत. या सेंटरमध्ये फेसबुक, गूगल, माईक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपन्यांचा डेटाही स्टोअर असतो. डेटा सेंटरला सतत म्हणजे २४ तास वीजेची आवश्यकता असते. संपूर्ण जगाच्या वीज उत्पादनापैकी ३ टक्के इतका वापर डेटा सेंटरला वापरला जातो. २०२२ पर्यंत प्रत्येक तासाला १४० अब्ज किलोवॅट इतक्या विजेची आवश्यकता पडेल. वाढत्या वापरासोबत गरज आहे ती पॉवर प्लांटची. म्हणजेच आणखीन ५० पॉवर प्लांटची गरज आहे. ५० पॉवर प्लांटसाठी १०० मैट्रिक टन कार्बन बाहेर पडतो. एकंदरीत तो पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ काढणं सोपं आणि मजेशीर असलं तरी, पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे.
जर, तुम्हालाही सतत सेल्फी घेण्याची आवड असेल, तर लवकरात लवकर आपल्या या सवयीला ‘बाय बाय’ म्हणा. कारण जास्त सेल्फी काढण्याची सवय तुम्हाला तुमच्या वयापेक्षा लवकर वयस्कर बनवते. तसेच ही सेल्फी तुमच्या अनेक आजारांना कारणीभूत देखील ठरू शकते.
*सेल्फीचे दुष्परिणाम :*
१. सेल्फी घेण्याची सवय तुम्हाला ओसीडीचा रुग्ण बनवू शकते. ओसीडी हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. आजकाल अनेक तरुणांमध्ये ही समस्या वाढत आहे. यात एखाद्या व्यक्तीला सेल्फी घेण्याचे व्यसन लागते. ओसीडी झालेल्या रुग्णाचे मन त्याला वारंवार कुठेतरी जाऊन सेल्फी घेण्यास भाग पाडते.
२. या व्यतिरिक्त अॅक्यूट सेल्फाइटिसची समस्या देखील सध्या अनेक तरूणांमध्ये दिसून येत आहे. यात एखाद्या व्यक्तीला दिवसातून तीन ते चार वेळा सेल्फी घेण्याची इच्छा होत राहते. त्याचबरोबर वारंवार सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची आणि सोशल मीडियावरील कमेंट वाचण्याची सवय लागते. याशिवाय बहुतेक तज्ज्ञांचे असे मत आहे की, सेल्फी घेताना चेहऱ्यावर पडणारा निळा प्रकाश आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. सेल्फी घेताना सनस्क्रीन लेयर मोबाइलमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गास रोखू शकत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते.
३. सेल्फी काढण्याच्या सवयीमुळे वय देखील वेगाने वाढत असल्यासारखे वाटते. तरुण वयात एखादा व्यक्ती वृद्धत्वाकडे झुकल्यासारखा दिसू लागतो. या सवयीमुळे आपल्या चेह-यावर अकाली सुरकुत्या पडू लागतात, ज्यामुळे आपण अकाली म्हातारे वाटू शकता.
४. सेल्फी घेताना मोबाइलमधून निघणाऱ्या हानिकारक रेडिएशनचा परिणाम त्वचेमध्ये असलेल्या डीएनएवरही होतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज होऊन, तिची पुन्हा सजीव होण्याची क्षमता प्रभावित होते.
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular