Saturday, July 27, 2024
Homeभंडारावनाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद!

वनाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद!

प्रकरण बिबट्याच्या मृत्यूचे : पाच दिवस लोटूनही तपासाची गती शून्य

विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
भंडारा : गुरुवारच्या पहाटे एक बिबट साकोली तालुक्यातील चारगाव रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आला होता. या बिबट्याचा मृत्यू शेतातील विद्युत ताराच्या प्रवाहाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. असे असले तरीही, मागील पाच दिवसांपासून वनविकास महामंडळाच्या वनाधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मृत्यू प्रकरणाला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नसल्याने प्रकरणाचा तपास थांबलेला आहे.


भंडारा वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पिटेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सौंदडकडून साकोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील चारगाव ते विर्शी फाटा दरम्यान दोन ते अडीच वर्षीय एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली होती. या बिबट्याच्या मृत्यूला पाच दिवसाचा कालावधी लोटला असतानाही वन विकास महामंडळाचे वनाधिकारी गंभीर नसून गाफील असल्याचे दिसून येत आहे.
सदर बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे वनविकास महामंडळाच्या वनाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली होती. मात्र, सदर मादी बिबट शेतशिवारातून जात असताना तिथे असलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला होता. मृत मादी बिबटच्या शरीरावरील केस
विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने जळाले होते. सदर व प्रकरण अंगलट येईल या भीतीने संबंधित शेतकऱ्यांनी जळालेले केस कापूल त्याचा अपघातात मृत्यू झाला असा देखावा रंगवून रस्त्यावर बिबट्याला फेकले.
दरम्यान गुरुवारी पहाटे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सावरगाव ते बार्शी फाटा मार्गावर बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी ही माहिती व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. मृत बिबट्याचा पंचनामा करून लागणीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गुणवंत भडके यांनी शवविच्छेदन केले. यात डॉ भडके यांनी मृत बिबट्याच्या शरीरावर अपघाताच्या कुठल्याही प्रकारच्या जखमा नसल्याचा स्वयंस्पष्ट अहवाल वनविकास महामंडळाला दिला आहे. या अहवालात भडके यांनी विद्युत प्रवाहाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. डॉ भडके यांनी शवविच्छेदन अहवाल शनिवारला दिलेला असतानाही वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मृत्यूचे गांभीर्य अद्यापही घेतलेले नाही. यावरूनच कदाचित वनविकास महामंडळाचे वनाधिकारी सदर शेतकऱ्याला पाठीशी घालत तर नसावे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

चौकट
अपघाताच्या खुना नाहीत
वन विकास महामंडळाने बिबट्याचा मृत्यू अपघातात झाल्याचे म्हंटले आहे. मात्र, घटनास्थळावर अपघात झाल्याच्या कुठल्याही खुना आढळून आल्या नाही किंबहुना मृत बिबट्या सुस्थितीत आहे. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून बिबट्याला रस्त्यावर आणून फेकले एवढे मात्र निश्चित.

चौकट
वनाधिकारी संशयाच्या भोवर्‍यात
पाच दिवसाचा कालावधी लोटलेला असतानाही वन विकास महामंडळाचे स्थानिक वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकारी आणि विभागीय व्यवस्थापक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य घेतलेले नसल्याचे आतापर्यंत लक्षात येत आहे. पाच दिवसानंतर ही वन विकास महामंडळाकडून दखल घेण्याऐवजी वरिष्ठांकडे याचा अहवाल पाठवल्यानंतर काय निर्णय होईल यावर ते विसंबून असल्याचे सर्वच वनाधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून सांगत आहेत.

चौकट
नाममात्र गुन्हा दाखल?
बिबट्याच्या मृत्यू प्रकरणात वन विकास महामंडळाने वन गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व प्रकरण विभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. यात विभागीय अधिकारी काय भूमिका घेतात अद्याप पाच दिवस लोटूनही काही कळले नाही. त्यामुळे या बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्यांना पळवाटा शोधण्यात वनाधिकारी सहकार्य करीत तर नाही ना ? असा संशय आता व्यक्त होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular