भंडारा :
ज्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बंद पुकारला आहे त्याच शेतकऱ्याला पोटासाठी शेतात राबावं लागतंय. बंदच्या दिवशीही शेतकरी शेतात काम करतोय. लखीमपुरमधील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात बंद पाळण्यात येत असला तरी शेतकरी मात्र आजच्या बंदच्या दिवशीही शेतात राबतोय.
शेतकरी कधी थांबला का? होय ह्या म्हणीची प्रतिची भंडारा जिल्ह्यात आली आहे. आज महाविकास आघाडीतर्फे लखीमपुर येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र बंद करण्याचं आव्हान केलं गेलं. परंतु भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात चित्र थोडं वेगळं दिसलं आहे. ज्या शेतकऱ्याकरिता हा बंद पुकारण्यात आला तो बिचारा शेतकरी शेतावर गेला आणि आपलं दैनंदिन काम करू लागला आहे. हा बिचारा शेतकरी कसा थांबेल? शेतकरी हा अन्न धान्य पिकवणारा अन्नदाता असल्याने कितीही पाऊस, वादळ, वारा आला, कितीही संकटे आली तरीही शेतकरी शेतात राबतो. पिकवलेल्या अन्नावर उभ्या जगाला जगवतो. शेतकरी थांबू शकत नाही. कोरोना परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हा आपलं काम सोडलं नाही. आजही त्यांना पूर्ण देशाचा पोशिंदा म्हणून काम करायचं आहेच. मग बंद करा, की गाडीखाली चिरडून काढा याकडे त्याचे लक्ष नाही. तो आपले काम अविरत करीत हे त्यांनी एकदा पुन्हा सिध्द करून दाखविले आहे.