• खाण परिसरात वृक्ष लागवड केली नाही
• कायनाईट माईन्स दिघोरी/मोठी येथील प्रकार
लाखनी :- खाण परिसरात पर्यावरण अबाधित राहावे. याकरिता उत्खनन लिज देते वेळी दरवर्षी २५ वृक्ष लावण्यात यावे. धुळावर नियंत्रणासाठी खाण परिसरात पाण्याचे फव्वारे मारण्यात यावे. खोदकामानंतर पडलेल्या खड्ड्यात पाणी साठवून सिंचन व मासेमारी साठी उपयोग करावा. धुळामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे सुरक्षा उपकरणे पुरवावी. अशा अटी व शर्ती असल्या तरी खाण प्रबंधनाने यावर उपाययोजना केली नसल्यामुळे पर्यावरण विषयक अटीचे उल्लंघन केले असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

दिघोरी/मोठी गट क्रमांक १५५ आराजी १४.३३ हेक्टर क्षेत्रातून कायनाईट , सिलिमनाईट , क्वार्टसाईट , कोरंडम , पायरोफिलाईट इत्यादी खनिजांचे उत्खनन करण्यासाठी पी.एम. गोलछा यांना ऑगस्ट २००० मध्ये जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडून ३० वर्षासाठी लिज देण्यात आली होती. दर ५ वर्षांनी लिजचे नूतनीकरण करण्याची अट करारनाम्यात ठेवण्यात आली होती. मूळ मालक पी.एम. गोलछा असले तरी विनोद भुजाडे यांचे नावाने पॉवर ऑफ अटर्णी करून देण्यात आले आहे. खाणीत मजूर चालविण्याची जबाबदारी पर्यवेक्षक प्रकाश रामटेके व कटरे यांची असून पर्यावरण विषयक उपाययोजनांची जबाबदारी खाण प्रबंधनाची आहे. शासन पर्यायाने जिल्हाधिकारी भंडारा यांचेशी केलेल्या करारनाम्यानुसार पर्यावरणाचे संरक्षण जरुरी असून त्याकरिता खाण परिसरात रस्त्याचे कडेला दरवर्षी २५ वृक्ष लावणे. टाकाऊ आणि रीजेक्ट पदार्थ यांचा वेस्ट डंप मध्ये वृक्ष लागवड , खोदकामानंतर पडलेल्या खड्ड्यात पाणी साठवून सिंचन व मासेमारीसाठी उपयोग करणे. मोठे बोल्डर फोडताना ड्रीलींग , ब्लास्टिंग आणि क्रॉसिंग करतांना मोठ्या प्रमाणात आवाज होऊन धूळ निर्माण होतो. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन कामगाराचे आरोग्य धोक्यात येते. याकरिता कान , नाक व डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपकरणे पुरविणे , खाणीत खोदकाम करतांना अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी खाण प्रबंधनाची आहे. खाणीतून निघणाऱ्या सांडपाण्याचा पुनरवापर करण्यासाठी रीसायकल करावे. खाणीतून निर्माण होणाऱ्या धातूचे उत्पादन व टाकाऊ साहित्याची खाण परिसरात ने-आण करतांना झाकल्या स्थितीत करावयास पाहिजे. असे करारनाम्यात नमूद असताना खाण प्रबंधनाकडून ह्या बाबींचे सर्रास उल्लंघन होत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खाण मालकावर कसलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे मजुरांना श्वसनाचे विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाण प्रबंधनाकडून करारनाम्यातील अटी व शर्ती चा भंग केल्याप्रकरणी कारवाई होणे गरजेचे झाले आहे.