Tuesday, November 30, 2021
Homeचंद्रपुरपारंपारिक पिक पद्धतीला फाटा देत,शेतात केली गुळ निर्मिती

पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देत,शेतात केली गुळ निर्मिती

राजुरा : बदलत्या काळानुरूप शेतातील पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, पीक पद्धतीत बदल करण्याची इच्छाशक्ती असतानाही काही अडचणींमुळे आजही येथील शेतकरी पारंपारिक शेती पद्धतीनेच पीक घेत आहे. मात्र राजुरा तालुक्यातील पेल्लोरा येथील प्रयोगशील शेतकरी गजानन जुनघरी यांनी यावर्षी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत नैसर्गिक शेती करीत ऊस लागवड करून गुळाचा लघु कारखाना सुरु केला आहे. यांच्या या प्रयोगशील लघु उद्योगाची पंचक्रोशीत चर्चा होत असून जिल्ह्यातील पहिला गुळाचा लघु कारखाना उभारून इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा काळे सोने (कोळसा) व पांढरे (कपाशी) सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. यात राजुरा तालुक्यात बहुतांश जमिनीवर वेकोलीने जाळे पसरविले आहे तर उर्वरित शेत जमिनीवर जास्तीत जास्त शेतकरी पांढऱ्या (कपाशी) सोन्याचे उत्पादन घेत आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून वाढत असलेला गुलाबी बोन्डअळीचा प्रादुर्भाव यामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, निसर्गाचे अस्मानी सुलतानी संकट, दरवर्षी होत असलेली नापिकी यामुळे उत्पन्नापेक्षा लागवड खर्च जास्त असल्याने शेतकरी वर्ग पर्यायी पिकांकडे वळले आहे.

पेल्लोरा येथील जुनघरी यांनी नैसर्गिक शेती संबंधी अमरावती येथील पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे मार्गदर्शन घेऊन सतीश पिंपळे यांच्या सल्ल्यानुसार मागील वर्षी पंधरा हजार रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये माऊली नावाच्या ऊसाची लागवड केली. शेतात लागवड केलेल्या ऊसाची मळणी करून ऊस दुसरऱ्याला विकण्यापेक्षा स्वतःजवळ असलेले भांडवल लावून शेतात गुळ तयार करण्याचा लघु कारखाना सुरु करण्याचा विचार करून गजानन जुनघरी यांनी कवडु वडस्कर (मोहुर्ली), सुनील उमरे (नंदोरी) यांच्या मदतीने आठ लाख रुपये खर्च करून गुळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र, साचे, टप, कढई, बायलर व इतर साहित्य खरेदी करून कारखाना सुरु केला आहे.

जुनघरी यांना दोन एकर ऊसापासून तीन लाख रुपये किंमतीच्या पाच टन गुळ निर्यातीची अपेक्षा आहे. गुळ तयार करीत असताना यात कोणत्याही रसायनाचा वापर न करता विलायची, अद्रक व जायफळ टाकून शुद्ध नैसर्गिक गुळाची निर्मिती केली जात आहे.
मानवी जीवनात गुळाचे महत्व वाढले असून आरोग्यासाठी साखरेपेक्षा गुळाला अधिक पसंती असल्याने गुळाच्या विक्रीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. गुळाला वाढती मागणी पाहता जुनघरी यांनी हा प्रयोग सुरू केला असून सध्या परिसरात या गुळाला मागणी वाढली आहे. शेतामध्येच 80 ते 85 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. याअगोदर कोरपना तालुक्यातील लोणी येथील मारोती भोंगळे यांनी गुळ तयार करण्याचा अगदी छोटासा प्रयोग केला आहे. जुनघरी यांच्या अभिनय प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरत आहे.

कोट : १) पारंपारिक पीक पद्धतीमुळे शेतात फायदा कमी व नुकसान जास्त यामुळे नवीन प्रयोग म्हणून ऊस लागवड व गुळ तयार करण्याबद्दल माहिती घेऊन मित्राच्या मदतीने कोणतेही कर्ज न घेता जवळ असलेले भांडवल गुंतवून नैसर्गिक गुळ तयार करण्याचा लघु कारखाना (गुराळ) सुरु केला असून यात निश्चितच कमी खर्चात जास्त नफा मिळणार आहे, गुळ बनविणे सुरु असून सोबतच गुळाची विक्री सुरू आहे. : गजानन जुनघरी

२) ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी ऊस लागवड करण्यास काहीही हरकत नाही, ऊसाच्या पिकात जास्तीत जास्त फायदा होत असून शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीशिवाय इतर पिकांकडे वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे : गोविंद मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

9418 COMMENTS

  1. Aw, this was an exceptionally good post. Finding the time
    and actual effort to create a great article… but what can I say… I put things off a lot and never
    seem to get nearly anything done.

Comments are closed.

Most Popular