Thursday, September 19, 2024
HomeWorldमहिलांच्या अधिकारांबाबत तालिबानचा मुखवटा?

महिलांच्या अधिकारांबाबत तालिबानचा मुखवटा?


आता अफगाणिस्तान मध्ये तालिबानची सत्ता आहे. तालिबान ही कट्टर इस्लामिक संघटना म्हणून ओळखली जाते. २० वर्षांपूर्वी तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी अत्यंत कठोर कायदे होते. पण, आता तालिबानने महिलांचे हक्क अबाधित राहतील, असा दावा केला आहे. तरीही या सरकारमध्ये २० वर्षांपूर्वी महिलांची स्थिती काय होती आणि आताही ती तशीच राहणार का? याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. आता तालिबान महिला स्वातंत्र्याबाबत खरंच उदार होणार की हा फक्त एक मुखवटा आहे?


गेले काही दिवस सोशल मिडियावरून मिळेल त्या वाहनानं अफगाणिस्तानमधून पलायन करणा-या हजारोंचे फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्याची गोष्ट ही की यात स्त्री मात्र दिसत नाही. जवळपास सगळ्या फोटोत अफगाणी पुरूष दिसत आहेत. याचा अर्थ आता मागे जी जनसंख्या उरेल त्या बहुतांश स्त्रियाच असतील. शिक्षण नसणा-या, बाहेरच्या जगाचा गंधही नसणा-या, सतत पुरुषी वर्चस्वाखाली राहून दबलेल्या, पिचलेल्या अशा बहुसंख्य लोकसंख्येचं नवीन अफगाण सरकार काय करेल? हा खरा प्रश्न आहे. आधीच्या सरकारचे महिलांविषयीचे जे कायदे होते ते अबाधित राहणार असल्याचा दावा तालिबान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यांना इतर देशांची आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांची मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे सध्या ते मवाळ भूमिका घेत आहेत. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी अलिकडेच तालिबानची महिलाविषयक भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महिलांना आता काम करण्याचं स्वातंत्र्य असेल मात्र त्या सहाय्यकाच्या भूमिकेत काम करू शकतील, शिवाय कोणकोणत्या क्षेत्रात त्या काम करू शकतात यावर विचार करून त्यानुसार निर्णय घेता येईल असं सांगितलं. शरीयतच्या चौकटीत राहून महिला शिक्षणही घेऊ शकतील आणि नोकरीही करू शकतील. अफगाणिस्तानमधील स्त्रियांना सर्वप्रकारचं स्वातंत्र्य निश्चितच दिलं जाणार असल्याची ग्वाही तालिबान्यांनी दिली आहे. मात्र हे स्वातंत्र्य उर्वरीत जगाच्या कायद्यानुसार नसून शरीयतमधे जे सांगितलेलं आहे त्यानुसार असणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तान मध्ये राजकारणातील महिला, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका अशा अनेक महिलांचे यापूर्वीच नुकसान झाले आहे. पण, आता देखील तीच परिस्थिती येणार आहे का? याबाबत या सर्व महिला भयभीत झाल्या आहेत.
नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं धुमाकूळ घालायला सुरवात केली होती. २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं सरकार होतं तेंव्हा महिलांसाठी तालिबानी नियम काय होते? आजवर जी अफगाण स्त्री जगातील इतर देशातील स्त्रीसारखीच स्वतंत्र विचाराची आणि व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगणारी होती ती बुरखाबंद करून तिच्यावर जाचक नियम लादण्यात आले होते. काही अपवाद वगळता महिलांना बाहेर काम करण्याची परवानगी नव्हती. महिलांना शाळेत जायची परवानगी नव्हती. महिलांसाठी आरोग्यसेवा मर्यादीत होती. त्यांना कुठल्या पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्याची परवानगी नव्हती. महिला फक्त विशेष बस वापरू शकत होत्या आणि त्यांना फक्त पुरुष नातेवाईकांसोबत टॅक्सीमध्ये प्रवास करण्याची परवानगी होती. कुटुंबातील व्यक्तीशिवाय आणि बुरखा न घालता महिला रस्त्यावर येऊ शकत नव्हत्या. उंच टाचाची सँडल वापरायला परवानगी नव्हती. कारण पुरुषांना महिलेच्या चालण्याचा, तिच्या पावलांचा आवाज यायला नको. महिला सार्वजनिक ठिकाणी बोलत असेल तर अज्ञात व्यक्तींना तिचा आवाज ऐकायला जाऊ नये. रस्त्यावरून घरातील महिला दिसू नये म्हणून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील सर्व खिडक्यांना महिला दिसणार नाही अशा रंगाने रंगविणे. स्त्रियांना त्यांची छायाचित्रे काढणे, चित्रित करणे, वर्तमानपत्र, पुस्तके, स्टोअरमध्ये, घरी प्रदर्शित करण्यास मनाई होती. महिलांना त्यांच्या बाल्कनीमध्ये निघण्याची परवानगी नव्हती. महिलांना रेडिओ, दूरदर्शन किंवा कोणत्याही सार्वजनिक मेळाव्यात दिसण्यास मनाई होती. हे सर्व नियम शरीयतमधे असल्याचं सांगत ते पाळणं बंधनकारक केलं गेलं. ज्या स्त्रिया नियमांचं उल्लंघन करतील त्यांना शरीयतमधे दिलेल्या शिक्षांना सामोरं जावं लागलं. सार्वजनिकरित्या दगडांचा मारा करून हालहाल करून अर्धमेलं करणं किंवा पूर्णपणे मारून टाकणं, जाहीररित्या शिरच्छेद करणं, हातपाय कापणं अशा शिक्षा धार्मिक पोलिसांकडून दिल्या जात. साधी भाजी आणायला जायचं तरीही स्त्री एकटी घराबाहेर पडू शकत नसे. अगदी शेंबडं पोर असलं तरीही चालेल, मात्र एखादा पुरूष जातीचा मानव सोबत असल्याखेरीज स्त्री घराबाहेर पाऊलही ठेवू शकत नसे.
अफगाणिस्तान मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर शांततेची भाषा करणा-या तालिबानच्या ‘कथनी आणि करणी’त मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानमध्ये महिलांना समान अधिकार देण्याची भाषा करणाऱ्या तालिबान्यांनी सरकारी वृत्तवाहिनीतून महिला वृत्तनिवेदक खादिजा अमीनला नोकरीतून कमी केले आहे. तिच्याऐवजी एका पुरुष तालिबानी वृत्तनिवेदकाची वर्णी लागली आहे. तर, अन्य महिला पत्रकार शबनम दावरानने सांगितले की, हिजाब घातल्यानंतरही तिला कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. अफगाणिस्तानातील हजारा समाजाच्या मुलींशी तालिबानी जबरदस्तीने विवाह करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे हा समाज सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. त्यांच्या या क्रौर्यामुळे भयभीत झालेल्या मुलींना त्यांचे पालक काबूलकडे पाठवत आहेत. हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. अफगाणिस्तानातील एकूण लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के इतकीच त्यांची संख्या आहे. या समाजातील नेत्यांच्या मूर्तींचीही तालिबान्यांनी तोडफोड केली होती. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर महिलांना काम करण्याची शरियतनुसार परवानगी असणार असल्याचे म्हटले होते. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नसल्याचे तालिबानी नेत्यांनी म्हटले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे यावरुन दिसून येत आहे. एकदा त्यांना जगाचे समर्थन मिळाले, की ते परत महिलांविषयीचे कठोर कायदे लागू करतील. बुरख्याच्या आत श्वास घेण्याचं स्वातंत्र्य सोडलं तर इतर फारशी स्वातंत्र्यं नसणा-या अफगाणी स्त्रीचं आता भविष्य काय असेल? आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणी स्त्रीचा संघर्ष कमी कधीच नव्हता आता तो आणखीनच वाढेल यात उर्वरीत जगाला अजिबात शंका नाही. म्हणूनच सगळं जग सध्या या महिलांच्या जगण्याच्याबाबतीत चिंतेत आहे.
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular