Tuesday, February 27, 2024
HomeIndiaअभिनयाचा जादूगार : दिलीप कुमार

अभिनयाचा जादूगार : दिलीप कुमार


दिलीप कुमार म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक अजरामर नाव. केवळ चित्रपटात काम करुन प्रेक्षकांच्या मनोरंजनापलिकडेही दिलीप यांनी त्या भूमिकांतून स्वत:ला देशातील एक मानाचा व्यक्ती बनवलं. दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत, त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत. कालची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. काल सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांचे मूळ नाव मुहम्मद युसुफ खान होते पण ते जगभर दिलीप कुमार नावानेच ओळखले गेले. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते १२ भावंडांपैकी एक अपत्य होते. वडील फळविक्रेते आणि सावकार होते, त्यामुळं घरात सधनता होती. पेशावर आणि नाशिकच्या देवळालीमध्ये त्यांच्या मालकीच्या फळबागा होत्या. देवळालीच्याच बार्नेस स्कूलमध्ये दिलीप कुमारांचे प्राथमिक शिक्षण झाले. अभिनेते राजकपूर हे दिलीप कुमारांचे बालमित्र.

पुढे दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी ६३ चित्रपटात काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय. १९७६ नंतर पाच वर्षे दिलीपकुमारांनी अभिनयापासून ब्रेक घेतला. पुनरागमन केले ते क्रांतीसारख्या अजरामर चित्रपटानंच. शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर अशा प्रेक्षकांना आजही भुरळ घालणाऱ्या चित्रपटांनी दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध केलं. अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल-ए-आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे अनेक सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत.
१९४३ ला डॉ. मसानी यांच्याशी दिलीपकुमारांची गाठ पडली. डॉ.मसानी यांनी मालाडच्या बाँबे टॉकीजमध्ये मला मदत कर म्हणून नेले. तिथं दिलीपकुमारांची बाँबे टॉकीजची मालकीण आणि अभिनेत्री देविकाराणी यांच्याशी गाठ पडली. देविकाराणींनी त्यांना महिना १२५० रुपयांवर नोकरीवर ठेवले. महान अभिनेते अशोककुमार यांच्याशी दिलीपकुमारांची भेट झाली. अशोककुमार अभिनय नैसर्गिक करावा अशा मताचे होते. त्याचा दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रभाव पडला. दिलीपकुमारांचं उर्दूवर खूप चांगलं प्रभुत्व होतं. त्यामुळं बाँबे टॉकीजमध्ये त्यांना सुरुवातीला पटकथा लिहण्याचं काम मिळत गेलं. देविकाराणींनी त्यांना युसूफ कुमार ऐवजी दिलीप कुमार हे नाव लाव अशी विनंती केली आणि १९४४ ला म्हणजे वर्षभरातच ज्वारभाटा चित्रपटात अभिनेत्याची भूमिका दिली. चित्रपटसृष्टीतल्या एका सुपरस्टारचा हा प्रवेश होता. ज्वारभाटा फ्लॉप ठरला. अजूनही काही सुरुवातीचे सिनेमे फ्लॉपच ठरले. पण दिलीपकुमारांनी हार मानली नाही. तीन वर्षे अशीच गेली. १९४७ ला नूरजहाँ अभिनेत्री असलेला जुगनू चित्रपट मात्र हिट ठरला. पुढच्याच वर्षी शहीद आणि मेला हे दोन चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
१९५० ते ६० च्या दशकात जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत असे किती तरी गाजलेले चित्रपट दिलीपकुमारांनी दिले. १९८५ च्या दाग चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. देवआनंद यांच्यासोबतचा देवदासही याच दशकातला होता. नया दौर, मधुमती, यहुदी, पैगाम असे कित्येक यशस्वी चित्रपट दिलीपकुमारांनी दिली. ट्रॅजेडी किंग असा बहुमानही त्यांना याच दशकात मिळाला. पण हा बहुमान धोकादायक ठरता ठरता राहिला. अनेक शोककारी पात्रांमध्ये खोल शिरण्याच्या खटाटोपात दिलीप कुमार स्वतःच डिप्रेशनची शिकार झाले. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हलकेफुलके चित्रपट करायला सुरुवात केली. १९५२ मधल्या आनमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केली. या चित्रपटाचा प्रिमियर लंडनमध्येही आयोजित केला गेला होता. आझाद मधली चोराची भूमिका, रोमँटिक कोहिनूर मधली राजपुत्राची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन राहिली.
१९५५ ते ५९ दरम्यान ते झपाटल्यासारखं चित्रपटात काम करत राहिले. अभिनय फुलत गेला. डायलॉगवर लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडत गेल्या. गाणी अभिनयासकट लोकांच्या मनात बसत गेली. या दशकात सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या टॉप ३० चित्रपटांमध्ये ९ चित्रपट तर दिलीपकुमारांचेच होते. दिलीपकुमार त्यावेळी एका चित्रपटासाठी १ लाख रुपये घ्यायचे. म्हणजे सध्याचे रुपयाचे मूल्यमापन लक्षात घेतले तर ते १ कोटी रुपयांवर जाते. सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमारांनाच मिळाला होता. इतकंच काय सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांनाच मिळालेयत. हिंदी चित्रपटसृष्टीतले महान कलाकार म्हणून त्यांची नोंद आहे. गिर्निज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा अभिनेता अशा विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर आहे. भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे. पाकिस्तानचा ‘निशान-ए-इम्तिआज’ या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. तो स्विकारण्याला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पुढे अटलबिहारी वाजपेयींशी सल्लामसलत करुनच दिलीपकुमारांनी पुरस्कार स्विकारला. उदयतारा नायर यांना दिलीपकुमारांनी आपल्या आयुष्याची वाटचाल कथन केली. त्याचंच पुढं द सबस्टन्स अँड द शॅडो या नावानं दिलीपकुमारांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. २०००-२००६ या काळात त्यांनी राज्यसभेत खासदार पद ही भूषवलं आहे.
दिलीपकुमारांचे व्यक्तिगत आयुष्यही तितकेच रोमँटिक होते. मधुबालासोबत त्यांनी लग्न केलं नाही, पण त्यांचे अनेक वर्षांचे संबंध होते. नया दौर चित्रपटानंतर दोघांत बेबनाव आला. कोर्टात खटलाही चालला. वैजयंतीमाला दिलीपकुमारांच्या सर्वाधिक चित्रपटात अभिनेत्री होत्या. पडद्यावरची केमिस्ट्री बघून दोघेही वास्तवातसुद्धा प्रेमवीर वाटायचे. मधुबाला व कामिनी कौशलनंतर वैजयंतीमालाच नाव दिलीपकुमारांसोबत जोडलं गेलं. १९६६ साली त्यांनी अभिनेत्री सायराबानू यांच्याशी निकाह केला. त्या दिलीपकुमारांपेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. १९८१ साली त्यांनी हैदराबादच्या असमा जहाँगीर यांच्यासोबत दुसरा निकाह केला. पण दोन वर्षातच ते लग्न मोडलं. सायराबानू यांनी मात्र दिलीपकुमारांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. दोघांनाही मूल नव्हते. पण आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहिले.
दिलीप कुमार हे फक्त अभिनेतेच होते असं नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी केलेल्या मदतीची, दानशुरपणाचीही दखल जगात घेतली गेली. दिलीप कुमार हे झुंजार वृत्तीचे होते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु त्यांनी यशस्वीपणे त्यावर मात केली. अगदी आयुष्याच्या ९८ व्या वर्षी देखील ते आजारावर मात करुन घरी परतले. म्हणजे या वयात देखील त्यांची जिद्द कमालीची होती. अशा या महान अभिनेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. मात्र दिलीप यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई .
संपर्क- ९४०३६५०७२२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Most Popular