अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरूवारी हृदयविकाराने निधन झालं. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांसाठी सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला. टीव्ही जगतातलं एक मोठं नाव म्हणून सिद्धार्थ शुक्लाकडे पाहिलं जायचं. त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवासही तसा अनपेक्षितच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. २००४ मध्ये एकदा आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली होती. यानंतर सिद्धार्थला डिसेंबर २००५ मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. त्याने या शो मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले होते. तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील करिअरला सुरुवात केली होती. सिद्धार्थने टीव्हीवर आपलं नाणं खणखणीत वाजवलं. सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. त्याने ‘जाने पहचाने से अजनबी’, ‘सीआईडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव यू जिंदगी’ या मालिकांमध्ये काम केले. बालिका वधू या मालिकेतून सिद्धार्थने घराघरात आपली ओळख निर्माण केली होती. अलीकडेच तो ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता. त्याने बिग बॉसचा १३ वा सीझन जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडीचा सातवा सीझनही त्याने जिंकला होता. यानंतर या अभिनेत्याने बॉलिवूडकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं. २०१४ मध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया सिनेमात तो दिसला होता. याचवर्षी त्याची ब्रोकन बट ब्युटिफूल ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली होती. या सीरिजची खूप चर्चाही झाली होती.
सिद्धार्थ अत्यंत साधे जीवन जगायचा. तो नेहमीच रस्त्यावर फिरताना दिसायचा. सिद्धार्थ सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत होता आणि भरपूर दान करत होता. २०१८ मध्ये सिद्धार्थच्या कारला मोठा अपघात झाला होता. सिद्धार्थची भरधाव कार तीन गाड्यांना धडकली होती. त्यानंतर त्याची कार दुभाजकावर चढली होती. या अपघातात सिद्धार्थसह पाच जण गंभीर जखमी होते. तर २०१४ मध्ये देखील रस्ते अपघातातून सिद्धार्थ बचावला होता. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोहोचताच सोशल मीडियावरील जनता शोकाकुल झाली आहे. सध्या इंटरनेट जगात सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी ऐकून सोशल मीडियावरील लोक स्तब्ध झाले आहेत. बऱ्याच लोकांचा विश्वासही बसत नाहीये की ज्या कलाकाराने आपल्या अभिनयाने त्यांच्या हृदयामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे तो आता या जगात नाही.
सुरेश मंत्री,अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२