वर्धा : – सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय आणि स्वरताल संगत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शागीर्द संगीत महोत्सवातील साभिनय नाट्यसंगीतानुभव या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दिवंगत उस्ताद लड्डुमिया खां, दिलीप राऊत, डॉ. विनोद देऊळकर, प्रभाकरराव बावसे व भाग्यश्री सरोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बजाज जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या नाट्यसंगीत महोत्सवाचे उद्घाटन नाट्यसिनेदिग्दर्शक हरीश इथापे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकरंद उमाळकर होते. तर जिल्हा ग्रंथालयाचे सचिव गौरीशंकर टिबडेवाल, सतीश बावसे, संयोजक शाम सरोदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विविध संगीत नाटकांमधील पात्रांच्या वेशभूषेतील गायकगायिकांनी सादर केलेल्या परंपरागत नांदीने झाली. या महोत्सवात खांसाहेबांच्या वेशभूषेतील ज्येष्ठ संगीतज्ञ प्रा. विकास काळे यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ हे बिहागडा रागातील नाट्यगीत तर पंडितजींच्या वेशातील नितीन वाघ यांनी ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यगीत गायले. स्वयंवर नाटकातील रुख्मिणीच्या वेशभूषेत प्रवेश करीत केतकी कुळकर्णी यांनी ‘नरवर कृष्णासमान’ हे नाट्यपद तर खुशबू कठाणे यांनी ‘मम आत्मा गमला’ हे नाट्यपद सादर केले. डाॅ. भैरवी काळे मोहदुरे यांनी सुभद्रेची वेशभूषा परिधान करीत संगीत सौभद्र नाटकातील ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यपद सादर केले. अमित लांडगे यांनी हे बंध रेशमाचे या नाटकातील ‘काटा रुते कुणाला’ हे गीत सादर केले. ययाती आणि देवयानी या नाटकातील ऋषीच्या वेशभूषेतील कविनेसन यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ ही रचना सादर केली. कार्यक्रमाची सांगता भरतवाक्य या भैरवी सादरीकरणाने झाली. या सर्व गायकांच्या सुरेल व साभिनय गायनाला नाट्यसंगीतप्रेमी रसिकांनीही भरभरून दाद दिली. या गायक कलावंतांना संवादिनीवर नरेंद्र माहुलकर यांनी तर तबल्यावर शाम सरोदे, मंगेश परसोडकर, अनिल दाऊतखानी यांनी साजेशी संगीतसाथ केली. पारंपरिक मराठी नाटकातील सूत्रधाराची भूमिका साकारत अतुल रासपायले यांनी प्रत्येक पदाची पार्श्वभूमी मांडत हा नाट्यसंगीतानुभव अधिक श्रवणीय केला. या नाट्यसंगीतमय कार्यक्रमाचे दिग्दर्शन मनीष खडतकर यांनी केले. कलावंतांची रंगभूषा चंद्रकांत सहारे यांनी केली तर वेशभूषा अनुराधा पळसापुरे यांची होती. ध्वनीव्यवस्था अनिल काळे यांनी सांभाळली.
प्रारंभी प्रास्ताविकातून सतीश बावसे यांनी शागीर्द महोत्सवाच्या दोन दशकांची वाटचाल मांडली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. रुपाली सरोदे यांनी केले. आभार मंगेश परसोडकर यांनी मानले.
या महोत्सवाच्या आयोजनात स. ब. सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, कार्यक्रम प्रमुख डॉ. माधुरी काळे, सुनील रहाटे, विद्यानंद हाडके, अभिजित पळसापुरे, अविनाश काळे, दिलीप मादुस्कर, रमेश पोद्दार, तन्मय सरोदे, ओंकार मादुस्कर, ऋत्वा परसोडकर, संस्कृती कुलकर्णी, साधना उमाळकर व सदस्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.