आई आणि बाळाला लाभले नवजीवन
वर्धा : – चंद्रपूर येथून आकस्मिक उपचारांसाठी भरती झालेल्या २७ वर्षीय अतिजोखमीच्या गर्भवती स्त्रीरुग्णाचे यशस्वी आरोग्य व्यवस्थापन करीत आणि योग्य वेळी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करीत आई आणि बाळाला नवजीवन देणारे उपचार सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात करण्यात आले.
चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयातून रत्नमाला सुधाकर शेंडे (२७) हिला सुमारे दोन महिन्यापूर्वी अत्यंत अवघड परिस्थितीत सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यासाठी पाठविण्यात आले होते. रुग्णालयात सात महिन्यांची गर्भवती असलेल्या सदर रुग्णाला भरती केले असता ती सिकलसेलने ग्रस्त असलेल्याचे दिसून आले. शरीरात रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा परिणाम हृदयगतीवर दिसून येत होता आणि रुग्णाची श्वसनक्रियाही मंदावली होती. यकृतामध्ये हायडॅटिडच्या मोठ्या गाठी निर्माण झाल्याने पोटात तीव्र वेदनेने रुग्ण त्रस्त होता आणि त्यात बाळाची वाढही अपेक्षेप्रमाणे झालेली नसल्याचे स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. नीमा आचार्य यांना तपासणीत दिसून आले. अशा अवघडलेल्या परिस्थितीत प्रसूती करणे आई आणि बाळासाठी अत्यंत धोक्याचे असल्याने रुग्णाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. तिला तातडीने अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आणि स्त्रीरोगतज्ज्ञांसह मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. शौर्या आचार्य, शल्यचिकित्सक डॉ. राजू शिंदे व इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. पंकज बनोदे यांच्या सहकार्याने औषधोपचार व अन्य वैद्यकीय प्रक्रियेद्वारे रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. रुग्ण पूर्णतः सामान्य झाल्यानंतर गर्भारपणाचे साडेआठ महिने पूर्ण होताच शस्त्रक्रियेद्वारे रत्नमालाची प्रसूती करण्यात आली. या अतिजोखिमेच्या शस्त्रक्रियेत डॉ. नीमा आचार्य, डॉ. रेवत मेश्राम, भूलतज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ आणि परिचारिकांनी महत्त्वाची भूमिका बजावत दोन जीवांना नवजीवन प्रदान केले. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे डॉ. नीमा आचार्य यांनी सांगितले. तर, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णाला तातडीने सावंगी रुग्णालयात भरती करण्यासाठी पुढाकार घेतल्याने रत्नमाला आणि सुधाकर शेंडे या दाम्पत्याने रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेसोबतच आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केलेत.