* जिल्ह्यात पाच ऑक्सीजन प्लॅंटची निर्मिती
* प्रती मिनीट 2700 लिटर निर्मिती क्षमता
* 800 नवीन ऑक्सीजन बेडची वाढ
वर्धा : भविष्यातील ऑक्सीजनची गरज पाहता जिल्ह्यात पाच ऑक्सीजन प्लॅंट उभारण्यात आले आहे. यातील जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या प्लॅंटची विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.तडस उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सीजनचा तुडवडा जाणवला. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेसे ऑक्सीजन उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी मोठ्या क्षमतेचे प्लॅंट उभारण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात पाच प्लॅंट उभारण्यात आले आहे.
वर्धा येथील जिल्हा रुग्णालय दोन प्लॅंट उभारण्यात आले असून त्यातील एकाची क्षमता 1000 तर दुसऱ्याची निर्मिती क्षमता 500 लिटर प्रती मिनीट ईतकी आहे. या दोनही प्लॅंटची विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात वर्धासह कारंजा व हिंगणघाट येथे प्रत्येकी 500 लिटर तर आर्वी येथे 200 लिटर प्रती मिनीट क्षमतेचे प्रत्येकी एक प्लॅंट उभारण्यात आले आहे. या सर्व प्लॅंट मिळून जिल्ह्यात नव्याने 2 हजार 700 प्रती लिटर ऑक्सीजन निर्मितीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
उभारण्यात आलेल्या प्लॅंटमध्ये वर्धा व हिंगणघाट येथील प्रधानमंत्री केअर तर कारंजा व आर्वी येथील प्लॅंट हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आले आहे. नव्या प्लॅंट मधून 350 ऑक्सीजन बेड निर्माण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन बेड उभारणीचे काम हाती घेण्यात आल्याने या काळात तब्बल 800 नवीन ऑक्सीजन बेड तयार झाले आहे.