आज ‘गांधीजन’ चरित्रमालेचे प्रकाशन
वर्धा : विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखा आणि मगन संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधीजन’ या आठ पुस्तकांच्या चरित्रमालेचा संयुक्त प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ११ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मगन संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सर्वोदयी विचारक डॉ. उल्हास जाजू, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, चरित्रमालेतील ‘सर्वांचे गांधीजी’ या पुस्तकाचे लेखक डॉ. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ, ‘क्रांतिकारक ऋषी विनोबा भावे’ या पुस्तकाच्या लेखिका प्रा. मीना कारंजेकर, संपादिका अनुराधा मोहनी यांची उपस्थिती राहील. ‘गांधीजन’ पुस्तकमालेत आठ लेखकांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफ्फार खान, साने गुरुजी व आचार्य विनोबा भावे यांचे चरित्रलेखन केले असून पुण्याच्या मनोविकास प्रकाशनाने ही चरित्रमाला प्रकाशित केली आहे.
साहित्यप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे, सचिव रंजना दाते, सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, कार्यक्रम प्रमुख डॉ. स्मिता वानखेडे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.