पाच दिवसानंतर आमरण उपोषणाची सांगता
ग्रामसेविकेच्या बदलीसाठी सीईओंना पाठविला प्रस्ताव
आष्टी अंतोरा : ग्रामपंचायत वाघोली येथे पंतप्रधान आवास योजनेत प्रपत्र ड चे सर्वेक्षण करताना मूळ लाभार्थी जाणीवपूर्वक डावलून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, चपरासी, पोलीस पाटील यांचे नाव समाविष्ट करून हा सर्वे घरबसल्या करण्यात आला होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामपंचायतला पुनरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने कुठलिही कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर पाच दिवसानंतर आश्वासनाची पूर्तता झाल्याने या उपोषणाची सांगता करण्यात आली.
वाघोली, चिंचोली व नरसापुर या तीन गाव मिळून ही ग्रामपंचायत आहे. या गावांमधील उपोषणकर्ते राजू नासरे, रमेश धोटे, अक्षय राऊत, दुर्गेश कुरवाडे, किशोर कुरवाडे, महादेव कुरवाडे, मनीष मानकर, पांडुरंग इंगळे, हरिभाऊ धोटे, युवराज घावट, योगेश अवघड, प्रशांत मानकर, पारणु कुरवाडे यांनी ग्रामसेविका मंगला नागपुरे यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामसेविकेने दुर्लक्ष केल्याने हा वाद चांगलाच चिघळला होता.
अखेर ग्रामस्थांनी 18 ऑक्टोबरला पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. या प्रकरणी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मकरंद देशमुख यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेतील प्रपत्र ड चे सर्वेक्षण पुन्हा करण्यात येईल. सोबतच ग्रामसेविका मंगला नागपुरे यांची वाघोली ग्रामपंचायत मधून तातडीने बदली करण्याबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिले.त्यानंतर रात्री या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्यासह पोलिस कर्मचारी, वाघोली गावचे नागरिक, जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.