वर्धेकरांनी उत्साहात साजरा केला पक्षीसप्ताह
विद्यार्थ्यांनी घेतल्या पक्ष्यांच्या नोंदी – पक्षीसूचीचे पुनर्प्रकाशन
वर्धा : – बहार नेचर फाउंडेशन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षीसप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पाणवठ्यांवर पक्षीनिरीक्षण तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रमात वर्धेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सप्ताहाचा समारोप निसर्गरम्य ढगा परिसरात करण्यात आला. यावेळी, वर्धा जिल्ह्याच्या अद्यावत पक्षीसूचीचे प्रकाशन करण्यात आले.
ढगा भवन येथील वन विभागाच्या कॅम्पमध्ये आयोजित या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण अभ्यासक अतुल शर्मा होते. यावेळी, सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, खरांगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर गजबे, बहारचे उपाध्यक्ष दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने, डॉ. आरती प्रांजळे घुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. केवळ पक्षीच नव्हे तर एकूणच जैवविविधता निसर्गप्रेमींनी जपण्याचे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील शास्त्रीय नामावलीसह नोंद असलेल्या ३०३ पक्ष्यांच्या अद्यावत सूचीचे उपस्थितांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात आले. या दरम्यान जिल्हा उपवन संरक्षक राकेश सेपट आणि बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांनी या उपक्रमाला भेट दिली.
पक्षीसप्ताहाचे उद्घाटन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनी मुक्तांगण परिसरातील कमळ तलावावर करण्यात आले. त्यानंतर सात दिवस बहारचे सदस्य आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी इटकी डोह (कारला), साटोडा बरड, गांधी छत्री (पवनार), सावंगी मेघे टेकडी, मदन तलाव, ताटेकस व कालीकप आदी पाणवठे, लहान व मोठे तलाव, नदी व नाले, बांध, माळरान, टेकडी आणि घनदाट जंगल अशा वैविध्यपूर्ण ठिकाणी दररोज सकाळी पक्षीनिरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीचा उपक्रम राबविण्यात आला. सप्ताहाचा समारोप ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून जगविख्यात असलेले पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली यांच्या जयंतीदिनी ढगा भवन येथे करण्यात आला. सप्ताहादरम्यान सहभागी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांशी पर्यावरण संवर्धनाबाबत संवादही साधण्यात आला.
या आठ दिवसांच्या पक्षीनिरीक्षण उपक्रमात प्रा. किशोर वानखडे, रुपेश खेडकर, डॉ. राजेश आसमवर, राहुल वकारे, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, राजदीप राठोड, पवन दरणे, दर्शन दुधाने, अमोल मुनेश्वर, देवर्षी बोबडे, भारती गोमासे, मनीष ठाकरे, आकाश जयस्वाल, सुषमा शर्मा, डॉ. चंद्रकांत जाधव, नितीन ठाकरे, डाॅ. सुप्रिया गोमासे, डॉ. संदीप नखाते, नितीन वांदिले, मैत्रेय नगराळे, आशुतोष विचोरे, हर्षल दातार, आर्य भातकुलकर, अनघा नंदाने, हर्षल शिंपी, शर्वरी मुळे, विशाल बाळसराफ, विनोद साळवे, हेमंत धानोरकर, कल्याणी जाधव, संदीप मुळे, संदीप गुंडावर, प्रशांत काकडे, डाॅ. जयंत मकरंदे, पवन बोधनकर, मनाली नंदाने, अर्जुन जाधव, अभिनव गोमासे, अथर्व शिंदे, अमेय ठाकरे, आरुषी देव, चैतन्य घुसे, अर्जुन देशमुख, स्नेहल कंडे, दिपेंद्रसिंग सोलंकी, रवी पुनसे, आयुष्य मुनेश्वर, ऋषिकेश वंजारे, अथर्व भिंगारे, ओंकार मादुस्कर, शोण जयस्वाल, राधिका सबाने, जिगीषा दांडगे, ओजस तारका यांच्यासह वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनरक्षक सहभागी झाले होते.
पन्नासहून अधिक पक्षीप्रजातींची नोंद
जिल्ह्यातील विभिन्न पक्षीअधिवासात लाल डोक्याचा बदक, कमळपक्षी, सर्पगरुड, कापशी घार, मधुबाज, शिक्रा, ठिपकेवाला पिंगळा, पाणकोंबडी, पाणकावळा, पाणभिंगरी, तुतारी, धोबी, चंडोल, खंड्या, हळदीकुंकू बदक, मुनिया, मनोली, हुदहुद, हळद्या, सुभग, सोनेरी पाठीचा सुतार, चंडोल, भारद्वाज, खाटीक, नीलपंख, श्वेतकंठी, राखी धनेश, सुगरण, रंगीत करकोचा, लाल मानेचा करकोचा, मोठा बगळा, गायबगळा, तितर, भिंगरी, कंठेरी, शराटी, चिखल्या, शेकाट्या, निलांग माशीमार, पानचिमणी, पर्णपक्षी, टकाचोर आदी अनेक दुर्मिळ तसेच स्थलांतरित पक्ष्यांसह पन्नासपेक्षा अधिक प्रकारच्या प्रजातींची नोंद गे करण्यात आली. याशिवाय, बहार व वन विभागाच्या सहकार्याने आर्वी येथील पक्षीमित्रांनी सारंगपुरी तलावाला भेट देऊन २३ पक्षीप्रजातींची नोंद घेतली.