भूगाव तलावावर विद्यार्थी पक्षीमित्रांचा मेळा
वर्धा : – बहार नेचर फाउंडेशन आणि भूगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भूगाव तलाव व तेथील ऑक्सिजन पार्क परिसरात साप्ताहिक पक्षीनिरीक्षण करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांसह सुमारे १०५ निसर्गप्रेमी पक्षीमित्र सहभागी झाले होते.
हिंगणघाट मार्गावरील या परिसरात आयोजित पक्षीनिरीक्षणात प्रामुख्याने भूगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, सेवाग्राम येथील आनंद निकेतन विद्यालय तसेच विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक विद्यार्थी व शिक्षक सायकलने आले होते. यावेळी प्रा. किशोर वानखडे, दीपक गुढेकर, दर्शन दुधाने, ॲड. प्रसाद सोईतकर, अतुल शर्मा व जयंत सबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे पाच गट तयार करीत परिसरात पक्षीनिरीक्षण करण्यात आले. यावेळी पक्ष्यांचे अधिवास, विविध प्रकारची घरटी, खाद्य, विविध प्रकारचे आवाज, विहारण्याच्या व उडण्याच्या पद्धती, पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व आदी अनेक बाबींवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. पक्षीनिरीक्षणाकरिता प्रथमच दुर्बिणीचा वापर करण्याचा आनंदही यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच निरीक्षणातील पक्ष्यांची ओळख, नावे, संख्या याची नोंद करीत विद्यार्थ्यांच्या गटांनी आपला अहवाल बहारकडे सादर केला.
या उपक्रमात सरपंच दुर्गा थूल, उपसरपंच महादेव धोपटे, ग्रामसेवक देवर्षी बोबडे, ग्रामपंचायत सदस्य भावना सावंत, प्रणिता कांबळे, मुख्याध्यापिका ललिता टोपले, मुख्याध्यापिका सुषमा शर्मा, विद्या वालोकर, सीमा मेहता, चंदा सुपारे, कल्पना पावडे, रवींद्र सातोकर, दिलीप थूल, गजानन मसराम, सचिन वानखेडे, बहार नेचर फाऊंडेशनचे राजदीप राठोड, अमोल मुनेश्वर, आर्य भातकुलकर, डॉ. सुरभी बिप्लव, ओजस प्रसाद, प्रशांत ठाकरे, हिमांशू लोहकरे, रोहित तिवारी, सुषमा सोनटक्के, दिव्येश सोनटक्के, शरद ताकसांडे, शंकर भोयर, अनघा नंदाने, चैतन्य पंकज घुसे, मयंक फाटे, शाळा समितीचे सदस्य तसेच गावातील निसर्गप्रेमींचा सहभाग व सहकार्य लाभले.