Thursday, July 25, 2024
Homeवर्धानऊ वर्षीय बालकाची दुर्मिळ आजारावरील शस्त्रक्रिया अखेर सावंगी रुग्णालयात मिळाला 'समर्थ'ला दिलासा

नऊ वर्षीय बालकाची दुर्मिळ आजारावरील शस्त्रक्रिया अखेर सावंगी रुग्णालयात मिळाला ‘समर्थ’ला दिलासा

वर्धा : महानगरातील दीर्घकालीन व खर्चिक उपचारांनंतरही आजार बरा न झालेल्या ग्रामीण भागातील नऊ वर्षीय समर्थला अखेर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील उपचारांनी सर्वतोपरी दिलासा मिळाला. या बालरुग्णावर झालेल्या दुर्मिळ अशा प्लेक्सिफाॅर्म न्यूरोफायब्रोमा आजारावरील शस्त्रक्रियेमुळे नवजीवन प्राप्त झाल्याचा आनंद पालकांनी व्यक्त केला.    बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा तालुक्यातील पोटळी या गावात वास्तव्य असलेल्या समर्थ ज्ञानेश्वर लाहुडकर (९ वर्षे) या बालकाला कपाळावरील ठणकणारी गाठ आणि त्यातून निर्माण झालेल्या डोकेदुखीमुळे असह्य वेदना सुरू होत्या. या आजारावरील उपचारांसाठी त्याला मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

तब्बल ५३ दिवस उपचार घेऊनही तब्ब्येतीत कोणतीही सुधारणा न दिसल्यामुळे पालकांनी समर्थला शिर्डी येथील धर्मदाय रुग्णालयात भरती केले. तिथेही आजार बरा न झाल्याने अकोल्याच्या एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र मोठा आर्थिक खर्च होऊनही आजार कायम राहिला.  या दरम्यान नांदोरा येथील सावंगी रुग्णालयाचे आरोग्यदूत तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मलकापूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मोहन पाटील यांची समर्थच्या पालकांनी भेट घेतली असता त्याला सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. समर्थला भरती करण्याबाबत पाटील यांनी पुढाकार घेत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्याशी संपर्क साधला. सावंगी रुग्णालयातील बालरोग विभागात ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत वाघ यांनी रुग्णतपासणी केली व न्यूरोसर्जरी विभागात आगामी उपचारांसाठी भरती होण्यास सांगितले. न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख डॉ. संदीप इरटवार यांनी रुग्णाची तपासणी केली असता कपाळावरील गाठीसोबतच डोक्यात जाड नस असल्याचे निदान झाले. प्लेक्सिफाॅर्म न्यूरोफायब्रोमॅटोसिस असे निदान झालेल्या या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. इरटवार यांनी घेतला आणि शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या डोक्यात वाढलेली १२ इंच लांबीची जाड नस यशस्वीरीत्या विलग करण्यात आली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या योजनेअंतर्गत सावंगी रुग्णालयात या बालरुग्णाची अद्ययावत शस्त्रक्रिया व संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर समर्थची प्रकृती सामान्य होताच त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. वेळीच उपचार म्हणजे जीवनदान – डॉ. इरटवार न्यूरोफायब्रोमॅटोसिस हा आनुवंशिक आजार असून या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने त्याचे रूपांतर कर्करोगात होते. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक असते, अशी माहिती डॉ. संदीप इरटवार यांनी दिली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular