अंबिका हिंगमीरे यांच्या संघर्षाला केला सलाम
वर्धा :
देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात कामगारांचा मोठा वाटा आहे मात्र अज्ञान आणि माहितीचा अभाव असल्याने कामगारांपर्यंत त्यांच्या योजना पोहचत नाही.श्रमिक ईमारत व ईतर बांधकाम संघटनेच्या वतीने कामगारांसाठी अविरत कार्य सुरू असून त्याचा फायदा देखील कामगारांना होत आहे. संघटनेच्या आणि कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांचे हक्क आणि अधिकार कामगारांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
श्रमिक ईमारत व ईतर बांधकाम कामगार संघटनेच्या आर्वी नाका येथील कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक ईमारत व ईतर बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्षा अंबिका हिंगमीरे या होत्या. तर उदघाटक म्हणून पालकमंत्री सुनील केदार उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहयोग फाउंडेशनचे सचिव मंगेश तायडे, प्रा. उमाकांत डुकरे,संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष होरेश्वर कोरडे, सचिव मयूर लांबट आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.अंबिका हिंगमीरे यांच्या वतीने पालकमंत्री सुनील केदार यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार देखील करण्यात आला.
पुढे बोलतांना केदार म्हणाले की, अंबिका हिंगमीरे यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ ही कामगार हिताची असून संघटनेमुळे कामगारांना त्यांच्या योजना, हक्क आणि अधिकारांचा लाभ मिळत आहे.कामगारांसाठी अंबिका हिंगमीरे करत असलेल्या संघर्षाला आपला सलाम असून कामगारांना कोणतीही मदत लागल्यास आपण नेहमी ती मदत करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील सुनील केदार यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात अंबिका हिंगमीरे यांनी म्हटले की,काही संघटना कामगारांची दिशाभूल करून त्यांचे आर्थिक नुकसान देखील करत आहेत त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांना प्रामाणिक सेवा देण्याच्या आणि त्यांची दिशाभूल थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यानी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंबिका हिंगमीरे यांना शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष होरेश्वर कोरडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरांगणा ब्रिगेड, अंबिका सोशल फाउंडेशन आणि श्रमिक ईमारत व ईतर बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी,सभासद यांनी सहकार्य केले.