Thursday, July 25, 2024
Homeवर्धाअ.भा. अंनिसचा लोकजागर स्मशान होलिकोत्सवग्रामीण भागातील कलाकृतींना मातीचा सुगंध असतो - हरीश इथापे'तेरवं'च्या निमित्ताने...

अ.भा. अंनिसचा लोकजागर स्मशान होलिकोत्सवग्रामीण भागातील कलाकृतींना मातीचा सुगंध असतो – हरीश इथापे’तेरवं’च्या निमित्ताने रंगली प्रकट मुलाखत

वर्धा – ‘तेरवं’ हे जागतिक स्त्रीसन्मानाचे भाष्य असून शेतीमातीतील वेदनेसोबतच पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. ग्रामीण भागातील कलाकृतींना नेहमीच मातीचा सुगंध असतो. मात्र ही कलाकृती केवळ विदर्भाची नसून अवघ्या महाराष्ट्राची आहे, असे प्रतिपादन ‘तेरवं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आयोजित स्मशान होलिकोत्सवात काढले. 


अंनिसच्या जिल्हा शाखेद्वारे स्थानिक स्मशानभूमीवर अठ्ठाविसाव्या लोकजागर होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात ‘तेरवं’च्या निमित्ताने नाट्यसिने दिग्दर्शक हरीश इथापे यांची संजय इंगळे तिगावकर, प्रवीण धोपटे व पल्लवी पुरोहित यांनी कधी खुसखुशीत तर कधी गंभीर प्रश्न विचारत ही मुलाखत फुलविली. तब्बल अडीच तास रंगलेल्या या मुलाखतीत हरीश इथापे यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टी, नवे तंत्रज्ञान यासोबतच शेतकऱ्यांसमोरील प्रश्न, एकल स्त्रियांसमोरील आव्हाने, वर्तमान काळातील समस्या अशा विविध पैलूंना हात घातला. शेती, माती आणि स्त्रियांच्या सन्मानाचा जागर करणारा तेरवं हा चित्रपट असून यातील ९० टक्के कलावंत हे विदर्भातील असल्याचे हरीश इथापे यांनी सांगितले. मात्र, हा चित्रपट वर्धा, यवतमाळ, अमरावती या ग्रामीण परिसरात चित्रीत झाला असला तरी ज्यांची नाळ शेतीमातीशी जुळली आहे, त्या सर्वांचा हा चित्रपट असल्याचे ते म्हणाले. सामाजिक व्यवस्था हे बोट असेल तर राजकीय व्यवस्था हे नख आहे. अनावश्यक वाढलेले आणि नको असलेले नख केव्हाही काढून टाकता येते. त्यासाठी सामाजिक व्यवस्थेचे बोट सक्षम असले पाहिजे, असे उद्गार हरीश इथापे यांनी काढले. 
या प्रकट मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना समर्पक व समयसूचक उत्तरे देत कधी हंशा, कधी टाळ्या तर कधी उपस्थितांना अंतर्मुख करण्याचे काम हरीश इथापे यांनी केले. यावेळी त्यांनी चित्रीकरणादरम्यान उद्भवलेले गमतीदार प्रसंग मांडून मुलाखत रंजक केली. नायिकेच्या हरविलेल्या पादत्राणाचा घोळ, चित्रपटात बाळाच्या चेहऱ्यावर दिसणारे ॲमेझॉनवरून मागविलेले मुंगळे, जात्याजवळ बसलेले कुत्रे, काही हौशी कलावंतांचा अतिउत्साह, अशा अनेक गमतीजमती इथापे यांनी वर्धेकरांसमोर मांडल्या. कलावंत हा कलावंतच असतो, त्यामुळे कलावंत आणि कलाकृती ग्रामीण की शहरी हा भेद न ठेवता निकोप दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे, असेही हरीश इथापे म्हणाले. आपण मूलतः रंगभूमीकर्मी असून वेगळ्या धाटणीचे चित्रपट चालून आल्यास आव्हान म्हणून तेही स्वीकारू आणि आलेल्या संधीचे सोने करू, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नाट्यकर्मी डॉ. सुरभी बिप्लव, संजय जवादे, संगीता इंगळे, कल्पना सातव पुसाटे, ॲड. नंदकुमार वानखेडे यांच्यासह उपस्थित नागरिकांनीही चित्रपटानिमित्त दिग्दर्शकांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाला अ.भा. अंनिसच्या युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विद्या राईकवार, उपाध्यक्ष दादाराव मून, ॲड. के. पी. लोहवे, डॉ. चंदू पोपटकर, डाॅ. धनंजय सोनटक्के, मुरलीधर बेलखोडे, प्रा. शेख हाशम, डाॅ. सीमा पुसदकर, तालुका संघटक रवी पुनसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गुल्हाने यांनी केले. संचालन प्रा. निलेश बोबडे यांनी केले तर आभार दर्शन दुधाने यांनी मानले. या कार्यक्रमात प्रारंभी सान्वी वंजारे या विद्यार्थिनीने होळीच्या रंगांचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. तर मारोती चवरे यांनी गावगाड्याचे बदलत गेलेले स्वरूप आपल्या कवितेतून मांडले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष मोडक, पी. के. खोबे, भूषण मसने, प्रमोद मुनेश्वर, शुभम जळगावकर, अथर्व भिंगारे, प्रा. सिद्धांत ढोके, सतीश इंगोले, संजय जवादे, डाॅ. किरण वंजारे, सुरज बोदिले, अभिजीत निनावे, देवर्षी बोबडे, सतिश जगताप, सुधीर पांगुळ, डॉ. मोहन राईकवर, सचिन देवगीरकर, आशिष पडोळे, सुनील पाटणकर, बालू येऊलकर, अंकुश कत्रोजवार, अंकुश पडोळे, जयंत सबाने, मुकेश लुतडे, आशिष पोहाणे, अजय भोयर, निखिल खोडे, ज्ञानेश्वर आटे, सारंग कत्रोजवार आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular