तळेगाव (शा.पं.) :- भारसवाडा येथे शुक्रवारी दुपारी एका घराला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत संपूर्ण घरासह, अन्नधान्य घरगुती साहित्य, कपडे, सोने, रोख रक्कम जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरातील दोन्हि व्यक्ती बाहेर गावी असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर शेजारील एका घराला आगीची झळ पोहचल्याने त्याहि घराचे मोठे नुकसान झाले आहे.
भारसवाडा येथील गणेश पांडुरंग रुंधे ७८ वर्ष हे पत्निसह राहत असुन दोन दिवसापुर्वीच हे दाम्पत्य बाभुळगाव ता. सेलु येथे मुलीकडे पाहुनपणासाठी गेले होते. दि. ३ जुन शुक्रवारला सकाळि १० वाजताचे सुमारास त्यांचे घराला अचानक आग लागली या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
ग्रामपंचात कर्मचार्यानी पाण्याची व्यवस्था करुन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.परंतु शेजारील एका घराला आगीची झळ पाेहचल्याने त्याहि घराचे मोठे नुकसान झाले. उन्हाची तिव्रता अधिक असल्याने इतरत्र आणखी घरांना आगीची झळ पोहचु नये याकरीता आष्टी येथील अग्निशमन वाहनाला बोलविले मात्र,गावातील अरुंद रस्तामुळे अग्निशमन वाहन आगीच्या ठिकानी नेण्याकरीता मोठ्या अडचनी निर्माण झाल्या तरिहि अतिरिक्त पाईपची व्यवस्था करुन आगीवर नियंत्रण मिळविले आगीची तीव्रता जास्त असल्याने संपुर्ण घर जळून खाक झाले. यामध्ये घरातील साहित्य, धान्य, कपडे , सोने, नगदी सात हजार रुपये व इतरही साहित्यजळून एकुन पाच लाखाचे नुकसान झाल्याने रुंदे कुटुंबाचा संसार पाऊसाळ्यापुर्वी उघड्यावर आला आहे. तर शेजारील भाष्कर जंवजाळ यांचेही घराला आगीची झळ पोहचल्याने त्यांचेही अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.
घटनास्थळी तळेगाव पोलीस, आष्टीचे नायब तहसीलदार दिपक काळुसे, तलाठी आठवले यांनी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.असुन पंचनामा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांचे कडे त्वरीत पाठविला आहे. तेव्हा नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रुंदे कुटुंबाने केली आहे.