विदर्भ कल्याण न्युज नेटवर्क
यवतमाळ : सामाजिक कार्यात यश मिळविण्यासाठी एकट्याच्या प्रयत्नाशिवाय सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टने याच सामूहिक प्रयत्नांतून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर मोघे यांनी येथे केले.
मोहनलाल शांताबाई राठी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा दिला जाणारा ‘वंदन सन्मान’ मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी तथा ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. किशोर मोघे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. ५१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येथील महेश भवनात रविवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी डॉ. प्रकाश नंदूरकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. घनश्याम दरणे, जीवनलाल राठी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मोघे म्हणाले, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या पाठीशी लोकांची ताकद असतेच. आपल्याला संस्थेमार्फत समाजाच्या विविध क्षेत्रात सामाजिक काम करताना माणसांच्या चांगूलपणाचा नेहमीच अनुभव आला. लोकांच्या विश्वासामुळेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टने जिल्ह्यात विस्तार करून शिक्षण, आरोग्य या मूळ कामासोबतच रोजगार, महिला बचत गट, गृहउद्योग, शेती, सिंचन आदी सर्वच क्षेत्रात काम करत आहे. वंदन सन्मान आपल्याला कायम प्ररेणा देत राहील, असे ते म्हणाले.
प्रा. घनश्याम दरणे यावेळी बोलताना म्हणाले, आज सर्वजण घेण्याच्या मागे लागले असताना देणारे हात फार मोलाचे आहेत. अशा काळात दातृत्वाच्या सामाजिक जाणीवेतून यवतमाळच्या राठी परिवाराने समाजासाठी झटणाऱ्या कर्मयोगींना सन्मानित करणे, ही संपूर्ण यवतमाळकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आपण समाजाचं देणं लागतो, ही भावनाच उद्याची संवेदनशील पिढी निर्माण करण्यात मोठे योगदान देणारी आहे, असेही ते म्हणाले.
प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक कार्याचे व्रत जोपासून डॉ. किशोर मोघेंनी समाजासमोर प्रेरणावाट निर्माण केली, असे गौरवाद्गार अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. संचालन विजय देशपांडे यांनी केले तर आभार सुरेश राठी यांनी मानले. प्रा. माणिक मेहरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आनंद कसंबे यांनी डॉ. किशोर मोघे यांच्या कार्यावर आधारित तयार केलेला लघुपट यावेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमास यापूर्वीचे वंदन सन्मानप्राप्त डॉ. अनिल पटेल, शेषराव डोंगरे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक, राठी परिवारातील सदस्य उपस्थित होते.