प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम
यवतमाळ : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. संकटाच्या काळात शासन, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या सहकार्याने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत राज्याचे आणि जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे विचार राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

पोस्टल ग्राऊंड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामात जिल्हा अग्रेसर आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात 2020 खरीप हंगामाकरीता पात्र शेतक-यांना 1578 कोटी 12 लाखांचे खरीप पीक कर्ज वाटप (73 टक्के) करण्यात आले आहे. कर्जवाटपात यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात प्रथम स्थानी आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात यावर्षी सर्वात जास्त पीक कर्जवाटप झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास 85385 शेतक-यांच्या खाते कर्जमुक्त झाले असून जिल्ह्यातील बँकामार्फत 629 कोटी 46 लक्ष रुपयांचा लाभ शेतक-यांना देण्यात आला आहे. शासकीय कापूस खरेदी हंगाममध्ये जिल्ह्यात विक्रमी कापसाची खरेदी झाली असून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरनारी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे यांचा सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम आलेला तन्मय कैलास नागपाल, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील शीतल गजभिये, प्रणाली चंदनखेडे, राहूल पंडीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच जिल्हयातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्ल्ेखनिय कामगिरी करणा-या शासकीय व खाजगी रुग्णालये यात डॉ.शेखर घोडेस्वार, श्री.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लाइफ लाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कॉटन सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.निलेश येलनारे (चिंतामणी हॉस्पीटल), उमरखेड येथील सेवा स्पेशालिटी हॉस्पिटल, संजीवन मल्टीस्पेशालिटी, हॉस्पिटल,साई श्रध्दा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दत्त हॉस्पिटल आदींचा समावेश होता.
चौकट
कोरोना योध्दांचा सन्मान
कोव्हीडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. गिरीष जतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, खाजगी संस्था यात संजय राठोड मित्र परिवाराच्या वतीने पराग पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचा सुध्दा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच यावेळी महाकृषी उर्जा अभियानांतर्गत संदीप फकीरचंद दुर्गे, शंकर पुनाजी गेडाम, अयुबखान सिकंदरखान पठाण, भवरीलाल रामदास पवार यांना डिमांड नोद देण्यात आली.