महागाव : धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन काँग्रेसने सातत्याने वाटचाल केली.धर्म,जात, पोटजात असे गैरलागू विषय टाळून महागाव नगरपंचायतीची निवडणुक केवळ विकासाच्या मुद्दावर काँग्रेस लढविणार आहे. शहरातील नागरिक यावेळी एकजुटीने काँग्रेसच्या बाजुने कौल देतील असा आत्मविश्वास आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी व्यक्त केला. महागाव येथी प्रियदर्शनी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगर पंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज कार्यकर्ता बैठक आणि सहविचार सभेचे आयोजन केले होते. माजी आ. विजयराव खडसे, राम देवसरकर, वनमालाताई राठोड, शिवाजीराव देशमुख, आरिफ सुरय्या, सुनील राठोड, शैलेश कोपरकर, महेंद्र कावळे, मालाताई देशमुख, मंदाताई महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील निवडणुकीत कॉंग्रेसने ५ जागा जिंकल्या, यावेळी मात्र शहरात काँग्रेसमय वातावरण आहे. जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर संपुर्ण जागा जिंकण्याचा विश्वास आहे. त्यासाठी काटेकोर पुर्व नियोजन केले जात आहे. शहरात करावयाच्या विकासात्मक कामांचा वचननामा जाहिर करून प्रामाणिक अंमलबजावणी करण्यास कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसी विचारधारेतील इलेक्टीव्ह मेरिट असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विजयराव खडसे, शैलेश कोपरकर, वनमाला ताई राठोड यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्त्यांची सहविचार सभा संपन्न झाली. संचलन आरीफ सुरय्या यांनी केले, आभार शिवाजीराव देशमुख यांनी मानले. सभेला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.