बाभुळगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत बाभुळगाव तालुका गटातून शेतकरी विकास आघाडीचे अमन गावंडे यांनी सलग दुस-यादा विजय संपादन केला. त्यांना एकूण ४६ मतांपैकी ३२ मते पडली. तर विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत कापसे यांना १४ मते मिळाली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल १४ मते फुटल्याची चर्चा निकाल लागण्याआधीच तालुक्यात होती. त्यामुळे अमन गावंडे यांचा विजय जवळपास निश्चित मानल्या जात होता. व निकालही त्याच प्रमाणे लागल्याने शेतकरी विकास आघाडी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. निकाल जाहीर होताच दि. २२ डिसेंबरला बाभुळगाव बसस्थानक चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून नेते व कार्यकर्त्यांपुढे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.