विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
भंडारा : घराच्या व्हरांड्यात ठेवलेल्या ॲल्युमिनियम ताराची चोरी प्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई जवाहरनगर पोलिसांनी केली.

राहुल रामरतन ढेंगे (२८), दिनेश रूपचंद मेश्राम (३२) दोन्ही रा. नवीन टाकळी, भगतसिंग वार्ड भंडारा असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे. १० डिसेंबरच्या रात्री खरबी नाका येथील यशवंत आकरे यांच्या घराच्या व्हरांड्यातून ९० किलो वजनाचा एक ॲल्युमिनियम ताराचा बंडल चोरी गेला होता. याप्रकरणी आकरे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
जवाहरनगरचे ठाणेदार ताजने यांनी तपासाची चक्रे फिरवीत राहुल आणि दिनेशला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ॲल्युमिनियमचा तार चोरी केल्याची कबुली दिली. दोघांकडूनही ६० किलो ॲल्युमिनियमचा तार पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराळे, पोलीस हवालदार एकनाथ जांभूळकर, पोलिस नायक स्वप्निल भजनकर, पोलीस शिपाई लोकेश शिंगाडे आदींनी केला.