Saturday, July 27, 2024
Homeभंडारा८० वर्षीय वृद्ध विधवा महिला २० वर्षापासून घरकुलाचे प्रतीक्षेत

८० वर्षीय वृद्ध विधवा महिला २० वर्षापासून घरकुलाचे प्रतीक्षेत

मुरमाडी/सावरी येथील प्रकार * गावातील राजकारणाचा फटका
लाखनी :-
जनकल्याणार्थ शासन अनेक योजनांची निर्मिती करते. पण प्रशासकीय लालफितशाही तथा गावातील राजकारणामुळे ह्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्यामुळे यशस्वी अमलबजावणी होत नसल्याचा प्रत्यय मुरमाडी/सावरी येथे आला. मंजुळा पैकु हटवार ह्या ८० वर्षीय वृद्ध विधवा महिलेस आणि कुटुंबीयास मागील २० वर्षापासून घरकुलचा लाभ दिल्या गेला नसल्यामुळे मोडकळीस आलेल्या जीर्ण झोपडीचा आश्रय घ्यावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.


मंजुळा हटवार(८०) यांना ३ मुले व ३ मुली असून २ घटस्फोटीत मुली तीचेसह मोडकळीस आलेल्या झोपडीत वास्तव्यात आहेत. ३ मुलांपैकी २ मुले मृत्यू पावली असून १ मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दोन्ही विधवा सूना व मुलगा भाड्याचे घरात राहतात. हा परिवार गेल्या अनेक वर्षापासून घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्नरत असला तरी ग्रामपंचायतकडून अद्यापही त्यांना घरकुलाचा लाभ दिला नसल्यामुळे भाड्याने राहण्याची वेळा आली आहे. भूमिहीन शेत मजुर त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे स्वतः चे घर तयार करता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अल्प व मध्यम स्वरूपाचा पाऊस आला तरी घरात पाणी शिरून मोठी गैरसोय होते. या मोडकळीस आलेल्या घरात वृद्ध आईचे सेवेत दोन्ही मुली असून त्या दिवसा मजुरीचे काम करतात. केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर देण्याची घोषणा केली असली तरी या कुटुंबास घरकुल एक दिवा स्वप्न ठरणार असल्याचे दिसते. हटवार कुटुंबीयांनी अनेकदा ग्रामपंचायतीसह पंचायत समिती कार्यालयाचे चकरा मारल्या. पण प्रशासनाकडून अ,ब,क,ड यादीचा पाढा वाचून या वृद्ध विधवा महिलेस परत पाठविल्याने तिचे घरकुलाचे स्वप्न धूसर होण्याचे मार्गावर आहे. या वृद्ध महिलेसह कुटुंबीयांना घरकुल देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता जीवन बावनकुळे यांनी केली आहे.

घरकुलातही ग्रामीण व शहरी असा भेदभाव(चौकट)
लाखनी , सावरी , मुरमाडी ह्या तिन्ही गावाच्या सीमा एकत्र असल्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या कोणाचे वास्तव्य कुठे आहे. हे सांगता येणे कठीण असले तरी लाखनी नगर पंचायत व मुरमाडी/सावरी येथे ग्रामपंचायत आहे. नगर पंचायतीत २ लाख ५० हजार व ग्रामपंचायत हद्दीत१ लाख ५० हजार रुपये घरकुलास अनुदान देण्यात येते. हा फरक म्हणजे ग्रामीण व शहरी असा भेदभाव आहे.
प्रतिक्रीया/स्टेटमेंट(चौकट)
विद्यमान घरकुल यादी २०१५-१६ मध्ये तत्कालीन ग्रा. प. कमिटीने तयार केली. त्यात मंजुळा हटवार हीचे नाव नव्हते. विद्यमान
कमिटीने क यादीत या विधवा महिलेचे नाव टाकले. पण काही तांत्रिक कारणामुळे २८६ पैकी ५६ नावांनाच मंजुरी मिळाली.
दुर्गेश चोले सदस्य ग्रा. प. मुरमाडी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular