भंडारा :
दिवाळी सण अगदी जवळ आला असल्याने आकाशदिवे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व पणत्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोक आपल्या घराची सजावट रोशनाई करण्यासाठी समानांची यांची खरेदी करीत असून यंदा स्वदेशी बनावटीच्या साहित्याची मागणी वाढली असल्याचे कळते . कोरोना महामारी मुळे मागील वर्षी पासून मंदावलेली बाजारपेठ दिवाळीच्या निमित्ताने आता पुन्हा गजबजू लागली आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक विक्री घर सजावटीच्या वस्तुंची होत असते. काही वर्षापासून स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. विशेषता दिवाळीसारख्या सण, उत्सवाच्या काळात वापरण्यात येणाèया सजावटीचे सामान, आकाशदिवे, लाइटिंग आदी वस्तू स्वदेशी निर्मित खरेदी करावे याबाबतचा आग्रह विविध संघटनांकडून केला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम आता जाणवू लागले आहे. त्यामुळे बाजारातून पूर्णतः नामशेष झाल्यागत असलेल्या स्वदेशी वस्तू पुन्हा झगमगू लागल्या आहेत.
आतापर्यंत स्वस्त आणि आकर्षक असल्याने चीनमधील उत्पादनांची बाजारात एकतर्फी विक्री सुरू होती. यात सर्वाधिक स्वस्त असलेल्या चायना बनावटीच्या लाइटिंग, लुकलुकणारे दिव्यांचे तोरण, आकाश दिवे, कंदील आदींची सर्वाधिक मागणी होती. वीस रुपयापासून ते दोनशे रुपये पर्यंत अनेक प्रकारच्या सजावटीचे चिनी बनावटीचे सामान मिळत असल्याने स्वदेशी निर्मितीचे आकाशदिव्याकडे ग्राहक पाहत देखील नव्हते. मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलू लागल्याचे चित्र आहे. बाजारात सर्वच दुकानांमध्ये स्वदेशी बनावटीचे लाइटिंग, आकाश दिवे, तोरण आदी गृहसजावटीच्या सामान उपलब्ध झाले आहेत. 50 रुपये पासून 500 रुपया पर्यंत विविध प्रकारच्या आकाशदिवे देखील दुकानांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ग्राहकांकडून स्वतःहून स्वदेशी साहित्यांची मागणी केली जात असल्याचे व्यापा-यांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत गांधी चौकातील व्यापारी पटेल यांनी सांगितले की, दरवर्षी आकाशदिवे व लाइटिंग खरेदी करण्याकरिता दिवाळीच्या महिनाभरापूर्वी पासून ग्राहकांची रेलचेल असायची. कोरोनामुळे दुकाने सुरू ठेवण्याबाबत आलेल्या मर्यादा व इतर निर्बंध उठविण्यात आले आहेत. असे असले तरी पूर्वीच्या तुलनेत बाजारात गर्दी काहीशी कमी आहे. येणारे ग्राहक आता स्वदेशी बनावटीचे आकाश दिवे व लाईटिंगची स्वतःहून मागणी करीत आहेत. आम्ही देखील यंदा चिनी बनावटीच्या वस्तू विक्री करिता आणल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. इंधनाची दरवाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढल्यामुळे वस्तुंच्या किंमतीही काहीशा वाढल्या आहेत. परंतु ग्राहक केवळ स्वदेशी वस्तू टिकाऊ राहत असल्याच्या नावावर समाधानाने पैसे देण्यास मागेपुढे पाहत नसल्याचेही कळते .