Monday, March 4, 2024
Homeभंडारास्थानिक गुन्हे शाखेची रेती तस्करांकडून अवैध वसुली

स्थानिक गुन्हे शाखेची रेती तस्करांकडून अवैध वसुली

• चूलबंद नदीतील रेती घाटावरील प्रकार • प्रति ट्रॅक्टर ३ हजार रुपये महिना अवैध वसुली
लाखनी :-
चुलबंद नदी पात्रातील रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी रेती तस्कारांकडून रेतीचा अवैध उपसा व वाहतूक सुरू आहे. याधंद्यास संरक्षण पुरविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रति ट्रॅक्टर ३ हजार रुपये महिना या प्रमाणे अंदाजे ३५ ते ४० ट्रॅक्टर मालकांकडून लाखो रुपयाची अवैध वसुली करणारे ते २ पोलिस कर्मचारी कोण ? याचा शोध घेणे आवश्यक झाले असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत.


चुलबंद नदी पात्रात मिरेगाव , सोनमाळा , भूगाव , विहीरगाव , पळसगाव , नरव्हा , पथरी व मारेगाव हे रेती घाट आहेत. या रेती घाटात बारीक व पांढरी शुभ्र रेती असल्याने तालुक्यासह तालुक्याबाहेरही बांधकाम व्यवसायात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. पण प्रशासनाने रेती घाटाचे लिलाव केले गेले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला. महसूल व पोलिस विभागाचे संरक्षणात अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू असली तरी यात स्थानिक गुन्हे शाखेचीही भर पडल्याच्या पालांदूर परिसरात चर्चा होत आहेत.
चूलबंद नदी घाटातून ३५ ते ४० ट्रॅक्टर द्वारे १५० ते २०० ब्रास रेतीची दररोज वाहतूक होत असल्याचे नदी काठावरील जनतेचे म्हणणे आहे. रेती तस्करांकडून महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांचेही हात ओले केले जात होते. पण आता स्थानिक गुन्हे शाखेची त्यात भर पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे २ कर्मचारी प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेपर्यंत वसुलीसाठी येतात. मरेगाव रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारे अंदाजे १२ ट्रॅक्टर मालक मरेगाव च्या एका ग्रामपंचायत सदस्याकडे प्रति ट्रॅक्टर ३ हजार रुपये महिना या प्रमाणे वसुली करून २ पोलिस कर्मचाऱ्याकडे दिली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. असाच प्रकार तालुक्यातील इतरही घाटातून सुरू असल्याचे समजते. तालुक्यात ३५ ते ४० ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करणारे आहेत. त्यांचे कडून प्रति महिना ३ हजार रुपये याप्रमाणे लक्षावधी रुपये स्थानिक गुन्हे शाखेकडून जमा केले जाते. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही रेती घाटावर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून दर महिन्याला कोट्यवधी रुपयाची माया गोळा केली जाते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लाखनी तालुक्यातील रेती तस्करांकडून अवैध वसुली करणारे ते स्थानिक गुन्हे शाखेचे २ पोलिस कर्मचारी कोण? याचा उलगडा होणे आवश्यक झाले आहे. महसूल व पोलिस पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेच्या रेती व्यवसायातील एंट्री मुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular