Thursday, September 19, 2024
Homeभंडारासामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे सुरु होणार

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे सुरु होणार

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

भंडारा,दि.02: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा लवकरच सुरु होणार आहे. याबाबतची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेली असून लवकरच नागपूर विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकप्रकारे दिलासा मिळालेला आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शासकीय वसतिगृहे बंद ठेवण्यात आलेली होती. काही वसतिगृहात शासनाच्या धोरणानुसार कोविड सेंटर किंवा गृह विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आलेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे शाळेत तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून विविध संघटनेकडून वारंवार निवेदने प्राप्त होत होती या निवेदनाची विशेष दखल घेऊन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता शासन स्तरावर पाठपुरावा केला व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांचेशी चर्चा करून, तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी याची दखल घेतली व विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुढाकार घेतला आहे.

सबब विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून विचार करता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नागपूर विभागातील शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. व येत्या 3-4 दिवसात सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात येतील, अशी माहिती डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी दिली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular