साकोली : बँकेच्या इमारतीमधील खिडकीची ग्रील गॅस कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने लॉकर तोडून त्यामधून 32 लाखांची रोख रक्कम लंपास केली.

सानगडी गावात एका भाड्याच्या घरात ही स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या इमारतीच्या मागे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आणि शेत आहे. चोरट्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत इमारतीच्या मागच्या भागात असलेल्या एका खिडकीच्या लोखंडी ग्रीलला गॅस कटरच्या साह्याने कापून इमारतीत प्रवेश मिळविला. त्यानंतर लॉकर हे गॅस कटरच्या साह्याने कापून त्यामधील नगदी बत्तीस लाख रुपयांची रोकड या चोरट्यांनी लंपास केली. मात्र या लॉकरमध्ये असलेले सोने आणि इतर रक्कम यांना काढता आली नसावी, असा एक अंदाज आहे. सध्या लॉकर हा पूर्णपणे बंद झाले असल्यामुळे यातील सोने चोरी गेले की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण होत असले तरी सोने चोरी गेला नसावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
बँकेत असलेल्या सीसीटिव्ही
कॅमेरामध्ये हा दरोडा दिसू नये म्हणून चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही चा डीव्हीआर चोरून नेला. त्यामुळे चोरी कशी झाली, हे सध्यातरी समजणं कठीण जात आहे. मात्र, चोरी ही मध्यरात्रीनंतर झाली असावी असा अंदाज वर्तविली जात आहे. बँकेत ४३ गावांचा आर्थिक व्यवहार होतो. मात्र, या बँकेत सुरक्षारक्षक नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे हा दरोडा घालणे सोपे गेले. सकाळी बँकेचा कंत्राटी चपराशी याने समोरून दार उघडताच बँकेत असलेल्या अस्ताव्यस्त सामानामुळे बँकेत चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर याची माहिती अधिकाऱ्यांना देऊन पोलिसांनाही माहिती दिली गेली.
घटनेची माहिती मिळताच साकोलीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उप पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्वानपथक घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली. या घटनेचा सखोल तपास करून घेण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध लावण्यासाठी पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सहा वेगवेगळ्या दिशेने चमू पाठविली आहेत.