विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
लाखनी : शिष्यवृत्तीकरिता महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना खोटे अपत्य प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांना पदावरून पायउतार करावे, अशी तक्रार ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

पदाचा दुरुपयोग तथा प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी केसलवाडा (वाघ) च्या सरपंच भारती सोमेश्वर उईके यांना महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये सरपंच पदावरून अपात्र करण्यात यावे, याकरिता प्रकाश उईके यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे तक्रार केली आहे. काय कार्यवाही केली जाते याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे. ११ सदस्यीय केसलवाडा (वाघ) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर २०१७ मध्ये पार पडली. सरपंचपद अनुसूचित जमाती महीलेकरिता आरक्षित असल्याने थेट जनतेतून निवडून येऊन भारती सोमेश्वर उईके या सरपंचपदी विराजमान झाल्या.
सुरुवातीचे काही दिवस योग्यरीतीने ग्रामपंचायतीचे कामकाज केल्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला असा आरोप होत आहे. गावात अनुसूचित जाती प्रवर्गातील होली, होलीया, चांभार जातीच्या व्यक्तींकडून अस्वच्छ व्यवसाय करून मेलेल्या पाळीव जनावरांची कातडी सोलण्याचे काम करणाऱ्या कुटुंबातील इयत्ता १ ते १० मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराकडून शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेत दोन अपत्याची अट आहे. सरपंच भारती उईके यांनी नीलकंठ जया वाघाडे, मोरेश्वर बाबुराव वाघाडे, मोतीराम घनश्याम राऊत, उदाराम मनिराम शेंडे, नागेश बळीराम शेंडे, अनिल गणपत चचाने यांना दोन अधिक अपत्य असताना खोटे अपत्ये प्रमाणपत्र देऊन पदाचा दुरुपयोग केला. तसेच प्रशासनाची पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारती उईके यांना ग्रामपंचायत अधिनियमान्वये सरपंच, सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात यावे, याकरिता विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडून काय कारवाई केली जाते, याकडे केसलवाडा (वाघ) ग्रामावसियांचे लक्ष लागले आहे.
चौकट
असे आहे शिष्यवृत्तीचे स्वरूप अस्वच्छ कामगारांच्या इयत्ता १ ते १० मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांना समाज कल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता १ ते ७ पर्यंत १८५० रुपये प्रति वर्ष याप्रमाणे लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा केली जाते, यासाठी सहा जणांना खोटे प्रमाणपत्र दिले आहे.