संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गेटवर ठेवला : वॅगनमध्ये सापडून झाली दुर्घटना
वरठी : दोन वॅगनला जोडणारी कपलींग जोडताना त्यात सापडून कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाला घेऊन नातेवाईकांनी मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवून संताप व्यक्त केला. ही दुर्घटना वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत घडली.
विकास गणवीर (५४) रा. सुभाष वॉर्ड, वरठी असे मृतकाचे नाव आहे. मृतक विकास हे सनफ्लॅग कंपनीतील एका कंत्राटदाराकडे मागील अनेक वर्षांपासून ए ग्रेड मजूर म्हणून कामावर होते. नेहमीप्रमाणे मंगळवारला विकास हा टीपलर प्लांट मध्ये कामावर होता. विकास हा बी शिप्टमध्ये कामावर होता. ती शिप्ट संपल्यानंतर ओव्हरटाईमला असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन वॅगनला जोडणारी क्लिप (कपलिंग) काढीत होता. नेमके याच वेळी तो दोन्ही वॅगनच्या मधात सापडला. यामुळे विकास गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सहकारी कामगारांनी मदतीचा हात देत, त्यांना बाहेर काढले.

गंभीर जखमी अवस्थेत विकासला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान आज बुधवारला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी याचा रोष व्यक्त करताना विकासचा मृतदेह सनफ्लॅग कंपनीच्या गेटसमोर ठेवला. ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. यावर कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या नियमानुसार जी आर्थिक मदत करता येईल, ती करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाइकांचा रोष शांत झाला आणि मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले.
असा घडला अपघात
कंपनीमध्ये कोळसा घेऊन जाणारी वॅगन पलटविण्याची जबाबदारी मृतक विकास यांच्याकडे होती. यानंतर कंपनीतील लोको ही वॅगन ओढत नेते. हि लोको टिपलरवर ठेवून तिला पलटविल्या जाते. ती खाली झाली की वॅगनला जोडण्याचे काम होते. वॅगनला जोडणारी कापलिंग जोडत असताना विकास या दोन्ही वॅगनमध्ये सापडून जखमी झाले. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुमारे दोन तास ठिय्या
संतप्त नातेवाईकांनी आर्थिक मोबदला आणि अन्य कंपनीचे लाभ मिळावे, यासाठी मृतदेहासह सुमारे दोन तास कंपनीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन केला. दरम्यान, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कंपनीचे कामगार प्रतिनिधी यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढून त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुढील सोपस्कारासाठी नेला.