साकोली :
सातबारा वेळवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी तालुक्यातील पिंडकेपार तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून तलाठ्याला कार्यालयातच बंद केले. दरम्यान एका माजी जि.प.सदस्याच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याने कार्यालयाचे कुलूप उघडून तलाठ्याची सूटका करण्यात आली.

पिंडकेपार तलाठी कार्यालयांतर्गत पिंडकेपार, गीदलापार, पिटेझरी, खैरी, आलेबेदर, डोंगरगाव व पांगरी या आठ केंद्रावर गावांचा समावेश आहे . शासनाच्या प्रत्येक नवीन निर्णयाप्रमाणे शेतक-याला आपल्या पिकाची नोंदणी ई-पीक पद्धतीने स्वतः करावयाची आहे. यामुळे अनेक शेतक-यांनी नोंदणी केली. तर काही शेतक-यांनी दुस-याच्या मार्फत नोंदणी केली. मात्र त्यात त्रुटी असल्यामुळे तलाठी कार्यालयात सातबारे देण्यास उशीर होत आहे.
मात्र शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्य देण्यासाठी नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत करावयाची आहे. तेथे सातबारा आवश्यक असल्याने शेतक-यांनी एकच गर्दी केली आहे. गुरुवारी पिंडकेपार तलाठी कार्यालयात शेतक-यांनी रोष व्यक्त करीत जिल्हा परिषद माजी सदस्य नंदू समरीत यांच्या नेतृत्वात तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून तलाठ्यांना आतमध्ये कोंडले होते. काही वेळेनंतर चर्चा करून कुलूप उघडण्यात आले. यावेळी तलाठ्यांनी तांत्रिक अडचण सांगून शेतक-यांचे समाधान करून लवकर सातबारे देण्यात येतील, असे आश्वासन दिले.