Saturday, July 27, 2024
Homeभंडाराशेतकरी कन्येची पर्यावरण रक्षणासाठी सायकलस्वारीराज्यभर भ्रमंती : भंडाराकरांनी केले उस्फुर्त स्वागत

शेतकरी कन्येची पर्यावरण रक्षणासाठी सायकलस्वारी
राज्यभर भ्रमंती : भंडाराकरांनी केले उस्फुर्त स्वागत


विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढत चाललेले प्रदूषण, मानवाची उपभोगवादी जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेले पर्यावरण यामुळे जीवनसृष्टीचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण संवर्धन, समाज जागृतीसाठी थेट यवतमाळ येथील एक शेतकरी कन्या राज्यभरात सायकलने भ्रमंतीसाठी निघाली आहे. ही कन्या शहरात दाखल होताच भंडाराकरांनी तिचे उस्फुर्त स्वागत करून तिच्याकडून प्रेरणा घेतली.


प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे असे या धाडसी शेतकरी कन्येचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पुनवट या छोट्याशा गावातील ही प्रणाली आता अवघ्या महाराष्ट्राला पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देत आहे. बीएसडब्ल्यू पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीला सामाजिक कार्याची जिज्ञासा होती. सध्या सर्वत्र वाहनांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे वातावरणात बदल झालेला आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने पर्यावरणाचे समतोल बिघडलेले आहे. गाव असो वा शहर सर्वत्र सिमेंटीकरणाला महत्त्व आल्याने जलस्त्रोतातही मोठी घट आली आहे. मनुष्याची जीवनशैली उपभोगवादी बनली असल्याने पृथ्वीच्या तापमानात वाढ झालेली आहे. यासोबतच जल प्रदूषण, ध्वनि प्रदूषण, वायू प्रदूषणही वाढले आहे. याचा थेट परिणाम आरोग्य व शेतीवर पडला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने नैसर्गिक साधनसामग्रीही लोप पावत चालली आहे. जंगले नष्ट होत असल्याने दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत आहे. याचा विपरीत परिणाम पशु पक्षांसह जनावरांनाही होऊ लागला आहे. सर्व जगाला तंत्रज्ञानाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा विचार मनात घर करून बसल्याने प्रणाली ही पर्यावरण संतुलन राहता यावे, यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकलने थेट यवतमाळ जिल्ह्यातील तिच्या छोट्याशा पुनवट या गावातून ४ ऑक्‍टोबरला निघाली आहे. ती राज्यातील कानाकोपऱ्यातील गावांमध्ये, शहरांमध्ये भेटी देत अवघे महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. दररोज किमान ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करून जमेल तिथे मुक्काम करणे आणि ग्रामस्थांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संदेश देणे, असा प्रणालीचा प्रवास सुरू आहे. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर हे जिल्हे करून प्रणाली भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. यानंतर तिचा पुढचा प्रवास गोंदिया असा राहणार आहे.

चौकट
भयमुक्त वातावरण
स्त्रीने घराबाहेर पडू नये, अशा मानसिकतेतून पुरोगामी महाराष्ट्र आता बाहेर आला आहे. एकटी स्त्री कुठेही जाऊ शकते, जणू हा संदेश प्रणालीने तिच्या सायकलस्वारीच्या माध्यमातून राज्यातील महिलांना किंबहुना युवतींना दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून घराचा उंबरठा ओलांडलेली प्रणाली चार जिल्हे पादाक्रांत करून भंडाऱ्यात पोहचली. अपरिचित व्यक्तींच्या संपर्कात प्रणाली येत असून तिला सर्वस्तरातून नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने तिच्यासाठी ते आयुष्याची पुंजी ठरली आहे.

चौकट
कोरोनातून पॉझिटिव्ह संदेश
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने दळणवळण बंद होती. यावेळी वाहनांमधून निघणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता लॉकडाऊन संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याने पुन्हा वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्य विषयक समस्या पुन्हा एकदा आवासून उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे करून आतून नागरिकांनी पॉझिटिव्ह संदेश घेत घेऊन वेळीच स्वतःला सावरावे आणि गरजांना थांबवावे, असा संदेश या पर्यावरण संवर्धन यात्रेतून प्रणाली देत आहे.

प्रतिक्रिया
ऋतुचक्र बदलत चाललेले आहे. याच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडली आहे. गाड्यांच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे गाड्यांचा कमी वापर करून सायकलचा वापर करावा. सोबतच इतरांना सांगण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करावी या माध्यमातून सायकलस्वारी राज्यभरात सुरू केली आहे. या प्रवासातून स्त्रिया विशेषता युवतींना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात जीवसृष्टी नष्ट होईल त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  • प्रणाली चिकटे
    सायकलस्वार पर्यावरणप्रेमी
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular