भंडारा :
आपल्या लहानग्या मुलासह घरी एकटीच राहणाऱ्या विधवेचा गावातीलच एकाने विनयभंग केला. या विनयभंगाने अपमानित झालेल्या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. ही घटना १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लाखांदूर तालुक्यातील आथली येथे घडली. याप्रकरणी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्माराम मेश्राम (वय ४२, रा. आथली) असे आरोपीचे नाव आहे. ही महिला आपल्या लहानग्या मुलासह १२ ऑक्टोबर रोजी घरी झोपली होती. त्यावेळी आत्माराम मध्यरात्रीच्या सुमारास तेथे पोहोचला. पैशाचे आमिष देत लगट करण्याचा प्रयत्न केला. विरोध करताच तो पळून गेला. मात्र जाताना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती तणावात होती. दुसऱ्या दिवशी घरी कुणी नसल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले. त्यावेळी तिचा मुलगाही अंशत: जळाला. शेजाऱ्यांनी तिला लाखांदूर येथे व नंतर भंडारा येथे दाखल केले. तिच्या बयाणावरून आरोपी आत्माराम मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.