भंडारा : शेतातील पिकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या ताराच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. मात्र, प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून शेतकऱ्याने सदर मृत बिबट रस्त्यावर आणून ठेवला. ही घटना साकोली तालुक्यातील पिटेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चारगाव बिटात गुरुवारला पहाटे उघडकीस आली.
भंडारा वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील चारगाव बेटातून जाणाऱ्या साकोली ते ते गोंदिया मार्गावर हा बिबट मृतावस्थेत आढळून आला. यामुळे वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान सदर बिबट्याचा मृत्यू हा विद्युत प्रवाहाने झाल्याने कारवाईच्या धास्तीने शेतकऱ्याने मृत बिबट रस्त्यावर आणून टाकला. बिबट्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाल्याचे चित्र भासविण्याचा प्रकार यातून करण्यात आला. मृत बिबट्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे पिटेझरीचे वनपरिक्षेत्राधिकारी गोविंद चव्हाण हे वनपाल राठोड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळावर पोहोचले.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याची माहिती वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नितीन कुमार सिंह यांना देण्यात आली. मृत बिबट्याला गडेगाव लाकूड आगारात आणून तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत फडके यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्या वर गडेगाव लाकूड आगारात अग्निसंस्कार करण्यात आले.
जळालेले केस कापले
विद्युत प्रवाहाने बिबट्याचा मृत्यू झाला. मात्र प्रकरण अंगलट येईल या भीतीने सदर शेतकऱ्याने बिबट्याचे जळालेले केस कापले. त्यानंतर मृत बिबट्याला रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर अपघात घडल्याचे चित्र रंगविण्यासाठी बिबट्याच्या शरीरावर जखम केली. विद्युत प्रवाहाने बिबट्याचे दोन्ही पाय व शेपटी ही डाव्या बाजूने जळाल्याच्या जखमा आहेत.
अडीच वर्षाची मादी बिबट
मृत पावलेला बिबट हा मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे अडीच वर्षाचे असल्याचे समोर आले आहे. सदर बिबट हा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावल्याचे वनाधिकारी सांगत असले तरी त्या बिबट्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या अपघाताच्या जखमा नाही. किंवा बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीचा ही प्रकार यामागे नसल्याचे सिद्ध होते.
प्रतिक्रिया
मृत बिबट याच्या शरीरावर विद्युत प्रवाहाच्या जखमा दिसून येत आहे. विद्युत प्रवाहाने जळालेले केस कापण्यात आले आहे. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघात झाल्याचे दाखविण्यासाठी त्याला रस्त्यावर फेकले असावे. मात्र, मृत बिबट्याच्या शरीरावर अपघाताच्या कुठल्याही जखमा दिसून आले नाही.
- डॉ गुणवंत भडके,
पशुधन विकास अधिकारी, लाखनी प्रतिक्रिया
पिटेझरी वनपरिक्षेत्राअंतर्गत रस्त्यावर बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. सदर बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावला असावा. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तो अहवाल प्राप्त होताच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, चौकशी सुरू आहे. - नितीन कुमार सिंह
विभागीय व्यवस्थापक,
वन प्रकल्प विभाग भंडारा