• मस्टर वर मजुरांची बोगस नावे
लाखनी :
वनक्षेत्राचे संवर्धन आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून निधीही उपलब्ध करतो. पण क्रियांवयन यंत्रणेतील काही स्वार्थी वन कर्मचाऱ्यांमुळे उद्देश पूर्ती होत नसल्याचा प्रत्यय लाखनी वन परिक्षेत्रात आला. फायर लाईन च्या कामावर बोगस मजुरांची नावे लिहून हजारो रुपये निधीची उचल करून फायर घोटाळा करण्यात आला आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून वन जमिनीचे क्षेत्र ४ हजार ३०२ हेक्टर आहे. यात मोठ्या झाडाचा जंगल तथा झुडपी जंगल अस्तित्वात असून सागवान , विजा , साजा यासारख्या मौल्यवान वृक्षांसह इमारती लाकूड फळ झाडे व वन औषधांची वृक्ष आहेत. वन संवर्धनासाठी तालुक्यात वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तसेच लाखनी , जांभळी/सडक व उमरझरी येथे क्षेत्र सहाय्यक कार्यालय तर १० वन रक्षक साझे आहेत. वन क्षेत्रात वाघ , बीबट , अस्वल , रानकुत्रे , लांडगा यासारख्या हिंस्त्र श्वापदांसह हरीण , मृग , सांबर , घोडेनील , ससा , रानडुक्कर यासारखे तृणभक्षी प्राणी तर साप , विंचू , घोरपड यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वन क्षेत्रात अधिवास आहे.
उन्हाळ्यात वन क्षेत्रास वनवा लागू नये. याकरिता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत फायर लाईन(जाळ रेषा) ची कामे केली जातात. यात बाह्य वन क्षेत्रालगतचे १२ मीटर रुंद तर रस्त्याच्या दोन्ही बाजूचे सहा सहा मीटर गवत , पालवी व काटेरी झुडपे कापण्याचे काम केले जाते. लाखनी वन परिक्षेत्रातील सर्व वन रक्षक बिटात ही कामे करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. काही ठिकाणी तर अग्नी रक्षकांकडून , अस्थायी वन मजुरांकडून ही कामे करून घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे वरदहस्ताने वन कर्मचाऱ्यांनी मर्जीतील व्यक्तींची मजूर हजेरी पत्रकावर नावे लिहून बोगस मजुरांची जावे हजारो रुपयाची उचल करून फायर घोटाळा केला आहे. असे वनव्याप्त गावातील ग्रामस्थांनी सांगितले. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची चौकशी केल्यास सत्यता बाहेर येण्यास फार वेळ लागणार नाही.