बंदचे आयोजकांची दुकाने सुरू
लाखनी :-
लखिमपुर/खिरी(उत्तर प्रदेश) येथे शांततेने उप मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविण्यासाठी शांततेच्या मार्गाने जात असलेल्या शेतकऱ्यांना मंत्री पुत्राच्या चारचाकीने चिरडल्याने ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीत इतर ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असला तरी उत्तर प्रदेश सरकारने मंत्री पूत्रावर कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ महविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ११ ऑक्टोबर रोज सोमवार ला महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. लाखनीत बाजार पेठ आणि शैक्षणिक संस्था सुरू होत्या. आयोजक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आपापली दुकाने सुरू ठेवल्यामुळे बंदचा फज्जा उडाल्याचे शहरात चर्चा होत आहेत. अशीच परिस्थिती तालुक्यातील पालांदूर/चौरास , मुरमाडी/तूप , पिंपळगाव/सडक पोहरा येथेही असल्याचे दिसून आले. बंद कालावधीत कसलीही अप्रिय घटना घडली नाही. वाहतूकही सुरळीत सुरू होती. बँकांसह शासकीय कार्यालये अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू होत्या. या प्रकाराने महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरासह तालुक्यात दिसत होते. यावरून सत्ताधारी पक्षांनी धडा शिकण्याची गरज निर्माण झाली आहे.