**युवक बिरादरीच्या ‘मंथन’मधून साधला संवाद
भंडारा:
युवकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. भंडारा युवक बिरादरीच्या वतीने आयोजित मंथन कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ते युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
भविष्यात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, त्याची गरज, भविष्यात ऊर्जेच्या स्त्रोतांमध्ये होणारे बदल, त्यासाठी आपण करायची तयारी, जगाच्या पाठीवर होत असलेल्या नवनवे संशोधन अशा विविध विषयांवर त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देखील दिले.
याप्रसंगी मंचावर जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह युवक बिरादरीच्या प्रकल्प संचालक (पूर्व विदर्भ विभाग) सरिता फुंडे, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पन्निकर, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे, भंडारा युवक बिरादरीचे अध्यक्ष पंकज इंगोले, संचालक वर्षा दाढी उपस्थित होत्या. कोरोना काळामध्ये भंडारा जिल्हा प्रशासनाची कामगिरी उत्तम होती. कोरोना लसीकरणाचे प्रमाण भंडारा जिल्ह्यात अतिशय चांगले आहे. या सर्व गोष्टीत जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची होती यासाठी त्यांचा सत्कार या प्रसंगी भंडारा युवक बिरादरीच्या वतीने करण्यात आला.
युवक बिरादरी (भारत)च्या ‘हिरवे अंगण’ आणि ‘घरपणातील नायिका’ या दोन्ही प्रकल्पांसाठी पूर्व विदर्भ विभागाच्या संचालक म्हणून सरिता फुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीसाठी भंडारा युवक बिरादरीच्या वतीने त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज इंगोले यांनी तर सूत्रसंचालन व आभार युवक बिरादरीचे प्रकल्प संचालक प्रशांत वाघाये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंडारा युवक बिरादरी कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ बिरादर सुरेंद्र कुलरकर, विक्रम फडके, वैभव कोलते, राधेश्याम बांगडकर, मोरेश्वर, प्रणित उके, दिपक गुल्लानी, शुभम टिचकुले, प्रज्वल निंबार्ते, सागर ठाकरे, प्रणोती नेवारे, श्रावणी पवार, श्वेता डोंगरे यांचे सहकार्य लाभले.