भंडारा :
विदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव अजूनही धोक्यातच आहे.
यातच जिल्हा प्रशासनाने बुधवारी भंडारा जिल्ह्यातील युक्रेनमध्ये गेलेल्या पाचही विद्यार्थ्यांची यथापरिस्थिती सांगितली असून, तीन विद्यार्थी रोमानियाच्या विमानतळावर, तर दोन विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर असल्याची माहिती दिली आहे. यात हर्षित चौधरी व विनोद ठवकर हे दोघे विद्यार्थी हंगेरीच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत, तर श्रेयश निर्वाण, निकिता भोजवानी व प्रीतेश पातरे रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रशिया व युक्रेनमध्ये युद्धाची सुरुवात होऊन आठवडाभराचा कालावधी झाला आहे. भारतातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित हा लॅव्हिव्ह शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता; परंतु युद्ध सुरू झाल्याने तो तिथेच अडकला. ऑडिओ क्लिप पाठवून त्याने भयानक वास्तव स्थिती काय आहे याबाबत आई-वडिलांना सांगितले होते. भंडाऱ्यातील साई मंदिर परिसरातील रहिवासी असलेल्या धीरज पात्रे यांचा मुलगा प्रीतेश हा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला आहे. तो सध्या रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यासोबतच श्रेयश व निकिताही त्याच विमानतळावर असल्याचे सांगितले आहे. विनोद ठवकर हा विद्यार्थीसुद्धा हंगेरी देशाच्या सीमेपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. पालकांची चिंता संपेना – जोपर्यंत काळजाच्या तुकड्याला आपल्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत आमच्या जिवात जीव नाही. युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण होत असतानाच त्यांना परत यावे, असे म्हटले होते. मात्र, विद्यार्थ्यांवर दबाव आल्याने ते मायदेशी परतू शकले नाहीत. आता प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले आहे. अशातच मंगळवारी कर्नाटक राज्यातील रहिवासी असलेल्या नवीन नामक विद्यार्थ्याचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने पालकांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. केव्हा एकदा आपला मुलगा घरी परततो याची चिंता पालकांना लागली आहे