भंडारा :
मोबाईलचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलने वेड लावले आहे. या वेडापायी कित्येकदा जीवसुद्धा गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक अचंबित करणारी घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली. पतीने आपला मोबाईल परत द्यावा म्हणून पत्नीने त्याच्यावर विळ्याने हल्ला करून त्याचे ओठच कापून टाकले. मासळ येथील खेमराज बाबूराव मूल (४०) यांचा स्वत:चा मोबाईल खराब झाल्याने त्यांनी पत्नीचा मोबाईल घेतला होता. परंतु दोन दिवस उलटूनसुद्धा पतीने मोबाईल परत न केल्याने १४ आॅक्टोबरला मोबाईलवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पत्नीने घरातील विळा उचलून खेमराज यांना फेकून मारला. तो खेमराज यांच्या तोंडा तों ला लागून त्यांचे ओठ कापले गेले. जखमी अवस्थेत खेमराज लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. खेमराज यांचे बयाण व वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी पत्नीविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३२४ व ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे करीत आहेत.