भंडारा : महात्मा फुले समता परीषदेची पूर्व विदर्भ विभागाची बैठक नागपूर येथे पार पडली. यावेळी भंडारा येथील पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष, तालुकाध्यक्ष व महिलाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महात्मा फुले समता परीषदेची विदर्भ विभागाची ही आढावा व पुढील नियोजनाची बैठक विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा कार्यकारीणी वर चर्चा करण्यात आली. सर्व जिल्ह्यात सर्व तालुकाध्यक्षांच्या नेमणुका करणे, तालुका कार्यकारीणी अद्यावत करणे, नागपूर व चंद्रपूर या दोन महानगरांमधील सर्व प्रभागांच्या विभागवार नियुक्त्या करणे, ओबीसींची जणगणना आणि ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा याबाबत माहीती, महात्मा फुले समता परीषदेची विनामुल्य सभासद नोंदणी करणे, ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे जिल्हा व तालुका स्तरावर नियोजन करणे या कार्यक्रमात किमान विविध क्षेत्रातील पाच गुणवंत, कार्यक्षम आणि समाजसुधारक, विद्यार्थींनी, युवती व महिलांचा सत्कार आयोजित करणे, महात्मा फुले समता परीषद आणि तिचे कार्य समाजाच्या सर्व विभागात, ग्रामीण विभागात, त्यांच्या विविध समस्यांना न्याय देण्यासाठी विविध मागणी आंदोलने करून पोचवणे, दिल्ली येथे कृषी कायदे रद्द करण्यासाठी जे शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे, त्याला समर्थन देवून, केंद्र सरकारच्या विरोधात, निवेदने, धरणे देऊन आंदोलने करणे, महात्मा फुले समता परीषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ आणि राज्य कार्यकाणीचे पदाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पुर्व विदर्भातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर, ओबीसींची जणगणना, केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतुद करणे, ओबीसी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्री आधार योजना सुरू करून वर्षाकाठी ६० हजार रूपये निधी मिळणे, महाज्योतीला आवश्यक एक हजार कोटीचा निधी देणे, या शासनाकडे मागण्या पाठविण्यासाठी, तालुका व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना निवेदने देणे व धरणे आंदोलने करणे.
या मागण्यांचे एक निवेदन खासदार व आमदार यांची भेट घेवून, त्यांना निवेदन देणे व लोकसभा व विधानसभा याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची विनंती करणे, महात्मा फुले समता परीषदेच्या विविध उपक्रम, निवेदने, धरणे आंदोलनात, विद्यार्थी विद्यार्थीनी, युवक व महिलांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचा प्रयत्न करणे, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर समता परिषद भंडाऱ्याचे जिल्हा संघटक अरुण भेदे, शहर अध्यक्ष चंद्रकांत कोहाड, तालुकाध्यक्ष लखन चौरे यांनी विविध समस्यासह काही उपाययोजनांबाबत विदर्भ अध्यक्ष प्रा दिवाकर गमे यांना निवेदन दिले.