Saturday, July 27, 2024
Homeभंडारामतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

 राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक
भंडारा :
भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील परिषद कक्षात श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या उपस्थितीत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपायुक्त आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी भंडारा रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी साकोली मनिषा दांडगे, सर्व तहसीलदार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करून, तसेच आपले स्तरावरून पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून सहकार्य करावे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासह नावातील दुरुस्ती, नाव वगळण्याचा अर्ज ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून याबाबत काही अडचणी असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर विशेष कॅम्पचे आयोजन करावे. प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांच्या माध्यमातून युवकांपर्यंत याविषयी माहिती पोहचवावी. ‘व्होटर हेल्पलाईन’ (Voter Helpline App) या मोबाईल ॲपद्वारे अथवा ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ (nvsp.in) द्वारे नाव नोंदणी, नाव वगळणे, मजकुरातील दुरुस्ती करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून याविषयी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात 18 ते 20 वयोगटातील तरुण नवमतदारांची नोंदणी होणे बाकी आहे. या नवमतदारांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहीजे तसेच 80 वर्षे वयोगटातील मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular