विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या उत्पादित भाजीपाल्याला योग्य दर व जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नगरपालिका प्रशासनाने भाजी बाजार सुरू केले. या भाजीबाजाराला बीटीबी असे नाव देण्यात आले होते. मात्र, आता बीटीबी भाजी बाजाराचे नामांतरण होणार असून तसा ठराव पालिकेने घेतला आहे. यापुढे बीटीबी ऐवजी महात्मा फुले भाजी बाजार असे नामकरण करण्याचा ठराव पालिका प्रशासनासह नगरसेवकांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.
शहराची वाढती लोकसंख्या व वाहनतळाची समस्या लक्षात घेता मोठा बाजार परिसरात भरणारा भाजीपाल्याचा ठोक बाजार इतरत्र हलविण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला होता. भाजीपाल्याचे ठोक विक्रेते बंडू बारापात्रे यांना भाजी बाजार चालविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रा लगतची जागा दिली. यासाठी भाजीबाजाराला बीटीबी असे नाव देण्यात आले. या भाजी बाजाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील भाजी उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली. बंडू बारापात्रे यांच्या माध्यमातून या भाजीबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाला उत्पादकांच्या भाज्यांना योग्य दर मिळू लागले.
नगरपालिकेने ही जागा बीटीबिला ३० वर्षासाठी लीजवर दिली. शासनाकडून लीजवर मिळालेल्या जागेवर भाजी बाजार सुरू करण्याकरिता बारापात्रे यांनी एक संस्था नोंदणीकृत करून त्या माध्यमातून हा भाजी बाजार सुरु केला. मात्र, शासनाकडून मिळालेल्या जागेवर बीटीबी असे नामकरण करण्याला अनेकांनी विरोध केला होता. मागील अनेक दिवसांपासून या बीटीबी बाजाराच्या नावावरून धुसफूस सुरू आहे. अखेर नगरपालिकेने बीटीबी बाजाराच्या या नावाला विरोध करीत तसा ठराव पालिकेने सभागृहात ठेवला. या ठरावाला नगरसेवक संजय कुंभलकर यांनी विरोध केला. तर उर्वरित सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने हा ठराव एक विरुद्ध उर्वरित नगरसेवक अशा अवाजवी मताने पारित केला. जर, बीटीबीचे संचालक या ठरवाविरुद्ध न्यायालयात गेले नाही तर, पालिकेच्या या ठरावानुसार यापुढे बीटीबी भाजीबाजार ऐवजी महात्मा फुले भाजीबाजार असे नामकरण करण्यात येणार आहे.
चौकट
नवीन वर्षात नवीन नाव
बीटीबी बाजाराचे नाव खोडून त्यावर आता महात्मा फुले भाजीबाजार असे नामकरण करण्याचा ठराव पालिकेने घेतला. दोन दिवसानंतर सुरू होणाऱ्या नववर्षारंभाला हे नाव या बाजाराला लागू होणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत मुख्याधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ठराव झालेला असून लवकरच नामांतराची प्रक्रिया राबवू, असे सांगितले.
प्रतिक्रिया
विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा
बीटीबी सब्जीभाजी व्यापारी असोसिएशनच्या नावाने २०१६ पासून सदर बाजाराचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. असोसिएशनने स्वनिधी उभा करून बाजाराची ही जागा विकसित केली आहे. या ठोक भाजी मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. २०२६ पासून न्यायालयीन प्रकरणे व इतर सर्व शासकीय कामे व पत्रव्यवहार असोसिएशनच्या नावाने सुरू आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव आमच्यासाठी आदर्शवत आहे. पालिकेने या संबंधात असोसिएशनला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावयास हवा होता. पूर्वसूचना न देता मार्केटचे नाव बदलविणे अन्यायकारक होईल. पालिकेशी करारनामा करताना अशा कुठल्याही प्रकारच्या नावाने मार्केट विकसित कराव्या, अशा सूचना दिलेल्या नाहीत. अद्याप पालिकेच्या ठरावाची प्रत असोसिएशनला प्राप्त झालेली नाही.
- बंडू बारापात्रे,
अध्यक्ष, बीटीबी भाजीबाजार भंडारा