भंडारा :
दिवाळीच्या तोंडावर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खेळखोळंबा पहावयास मिळत आहे. आधीच निरूंद रस्ते, त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे गांधी चौक ते मोठा बाजार मार्गावर वाहन चालविणे सोडाच पण पायदळ चालणेही कठीण झाले.
अशावेळी वाहतुक नियंत्रण कक्षातील पोलिसही दिसेनासे झाल्याने खरेदीसाठी जाणा-यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
भंडारा शहरातील गांधी चौक ते मोठा बाजार या रस्त्यावर सर्वच साहित्याची दुकाने असल्याने सणासुदीच्या दिवसात येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना दिसते. मात्र यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. या मार्गावर कापड, भांडी, सराफा, हॅण्डलून, सजावटीचे साहित्य आदी दुकाने व भाजीबाजारही आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. दिवाळीनिमित्त आता कापड खेरदी करता सर्वाधिक गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या वेळीही सर्वच दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील साहित्य दुकानाबाहेर रस्त्यावर सजवून ठेवले आहेत. त्यामुळे आधीच निरूंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने दुकानात येणा-या ग्राहकांना वाहने भर रस्त्यावर उभी ठेवावी लागतात. शहरात कोठेही वाहनतळाची सोय नसल्याने दूरदूरून वाहनधारकांचाही नाईलाज होतो. यावर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने समन्वयाने तोडगा काढून दरवेळी सणासुदीच्या काळात होणारा वाहतुकीचा खोळंबा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.