वैद्यकीय अधिकाऱ्यासह १३ जागा रिक्त * रुग्णांची होते गैरसोय
लाखनी :-
आरोग्य सेवेचा समावेश आवश्यक सेवेत होत असला तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचली नसल्याचा प्रत्येत मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. मंजूर ३६ पदापैकी आरोग्य सेविका , आरोग्य सेवक व इतर १३ पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नाही.
लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व चुलबंद नदी खोरे तथा जंगली भूप्रदेश अशी ख्याती प्राप्त मुरमाडी/तूप परिसरात दारिद्र्य रेषेखालील , अल्प – अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना नाममात्र शुल्कात आरोग्य सेवेचा लाभ मिळावा. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली.

मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात २ आयुर्वेदिक दवाखाने , ६ आरोग्य उपकेंद्र आणि २९ गावे समाविष्ट असून ३० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर देण्यात आली असली तरी रिक्त पदांमुळे पाहिजे त्या प्रमाणात सेवा दिली जात नाही. असे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे म्हणणे आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ३६ पदे मंजूर असली तरी १ आरोग्य अधिकारी , ५ आरोग्य सेविका , ४ आरोग्य सेवक पुरुष , परिचर २ आणि अंशकालीन महिला परिचर १ अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. इच्छा असूनही आरोग्य सेवा मात्र देता येत नसल्याचे दिसते.
उपकेंद्रांची परिस्थिती गंभीर(चौकट)
मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्र येत असले तरी खराशी , पालांदुर , मरेगाव , कोलारी व दीघोरी येथील आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्यामुळे स्तनदा व गरोदर माता तसेच अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणे आवश्यक(चौकट)
मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत निम्मी गावे चुलबंद नदीकाठावर आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जलजन्य आरार तसेच या परिसरातून लाखांदूर व पवनी तालुक्यास जोडणारा इतर जिल्हा मार्ग गेल्याने अपघाताची प्रमाणही अधिक आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही अधिक पण या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराचीच सोय असल्याने पुढील उपचारासाठी लाखनी किंवा साकोली ला न्यावे लागते. त्यामुळे रुग्ण दगवण्याचा धोका असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणे गरजेचे झाले आहे.