पथक गठीत : तीन ट्रकवर राज्यातील पहिला एफआयआर
भंडारा : – पर राज्यातून भंडारा जिल्ह्यात विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या धानाबाबत जिल्हा प्रशासनाने सक्त पावले उचलली आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. उत्तर प्रदेश व बिहार येथून भंडारा येथे विक्रीसाठी आलेले धानाचे तीन ट्रक पकडण्यात आले असून राज्यातील पहिला एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात धानाला जास्त भाव मिळत असल्यामुळे व्यापारी आपला धान महाराष्ट्रात विकायला आणत असल्याची बाब उघड झाली आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सक्त कारवाई सुरू केली आहे. पर राज्यातील धान भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर खरेदी केला जावू नये यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आली आहेत. संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा त्यांनी नेमलेला परिवहन अधिकारी, संबंधित उपविभागाचा निरीक्षक व संबंधित तालुक्याचा पुरवठा निरीक्षक हे या पथकाचे सदस्य आहेत. हे पथक त्यांच्या कार्यक्षेत्रात – तपासणी नाक्यावर करडी नजर ठेवणार आहेत. पर राज्यातील धान भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर आवक होत असल्याचे पथकास आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व आवश्यक तिथे फौजदारी दाखल करण्यात येतील.
पर राज्यातील धान विक्रीसाठी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबतीत जिल्हा प्रशासन सक्त झाले असून भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत तीन ट्रक धान प्रशासनाने पकडले आहे. पर राज्यातून जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येणाऱ्या धानाची माहिती असल्यास प्रशासन किंवा पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.